पुणे : आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) २६ व्या वर्धापनदिनानिमित्त भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) हणमंत गायकवाड आणि ‘उडचलो’चे सहसंस्थापक व ‘एआयटी’चे माजी विद्यार्थी रवी कुमार यांना सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या सोमवारी (दि. २४ फेब्रुवारी) ‘एआयटी’ २६ वा वर्धापन दिन साजरा करत असून, या सोहळ्यासाठी ‘एआयटी’चे पॅट्रॉन इन चीफ व सदर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहांती (एव्हीएसएम, एसएम, व्हीएसम) यांच्या हस्ते गायकवाड आणि कुमार यांना सन्मानित केले जाणार आहे. सोमवारी सकाळी १०.०० वाजता दिघी येथील संस्थेच्या सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे.
‘एआयटी’ची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली. आजघडीला १३०० पेक्षा जास्त विद्यार्थी संगणक, माहिती आणि तंत्रज्ञान, मेकॅनिकल, इलेकट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन यांसारख्या शाखांमध्ये अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. संस्थेचे अनेक विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट, एमेझॉन, बार्कलेज सारख्या नावाजलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि संशोधनाची सुविधा देणारी जागतिक ख्यातीची संस्था होणे हे संस्थेचे ध्येय आहे, असे संस्थेचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट यांनी नमूद केले.
हणमंत गायकवाड यांचा यशस्वी उद्योजक, तर रवी कुमार यांचा यशस्वी युवा उद्योजक म्हणून सत्कार केला जाणार आहे. गायकवाड यांनी भारतात हाऊसकिपींग आणि सुविधा व्यवस्थापन उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. या माध्यमातून ८०,००० हुन अधिक लोकांना रोजगार दिला. सेवा क्षेत्रात भारतातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या ‘बीव्हीजी’कडे भारतीय संसद, पंतप्रधान निवासस्थान, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, भारतीय रेल्वे यासह टाटा, मर्सिडीज बेंझ, बॉश, कमिन्ससारखे मोठे उद्योग, ‘एम्स’सारखी रुग्णालये, १५ मोठी विमानतळे आणि १२ प्रसिद्ध देवस्थानांच्या देखभालीची जबाबदारी आहे.
रवी कुमार संस्थेचे २००९ च्या बॅचचे विद्यार्थी असून, ‘उड चलो’चे सहसंस्थापक आहेत. मेकॅनिकल इंजिनीरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुमार यांना ‘युवा उद्योजक’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. नुकतेच त्यांना ‘एशियावन’ मासिकाकडून ‘चाळिशीतील सर्वात ४० प्रभावी आशियायी’ या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.


