पुणे: “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला विकास यामुळे आगामी काळात ई-वाहने प्रचलित होतील. त्यांना महत्व येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यासंबंधी ज्ञान आत्मसात करून ई-वाहनासमोर असलेली आव्हाने पेलण्याची तयारी करावी. अभियंत्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठ्या संधी असून, त्याचे महत्व आपण ओळखावे,” असे प्रतिपादन टेकनॉलॉजी ट्रान्सफर असोशिएशनचे (टीटीए) अध्यक्ष यशवंत घारपुरे यांनी केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या ‘हायब्रीड इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यातली आव्हाने’ या विषयावरील कार्यशाळेत यशवंत घारपुरे बोलत होते. प्रसंगी हेमंत पाध्ये, मार्टिन फर्नांडिस, नितीन बाणाईत, आनंद भेडसगावकर, विलास रबडे, चेतन कोरके, मंगेश मीठे या तज्ज्ञ आणि अनुभवी वक्त्यांनी आपल्या सादरीकरणातून सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सुपर कपॅसिटर आणि बॅटरी पॅक चार्जिंग यांचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.या कार्यशाळेसाठी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्राचार्य डॉ. कल्याणी जोशी, उपप्राचार्या डॉ. नीलिमा कुलकर्णी, प्रा. जपे, प्रा. बोरकर उपस्थित होते.
यशवंत घारपुरे म्हणाले, “भारत सरकारच्या २०३० पासून इ-वाहनांकडे वळण्याच्या उद्दिष्टाला अनुसरून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी इ-वाहनासंबंधी ज्ञान अवगत करण्याची गरज आहे. या अनुषंगाने उभी राहणारी आव्हाने ओळखण्याचे आणि ती आव्हाने पेलण्याची तयारी आपण केली पाहिजे. या परस्परसंवादी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनानंतर विद्यार्थ्यांनी यासारखे अधिकाधिक उपक्रम महाविद्यालयात आयोजित करायला हवेत. यासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबतही विचाराधीन आहोत.”
‘टीटीए’चे सचिव विलास रबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

