पुणे: “राष्ट्रपिता महात्मा गांधी हे निसर्गोपचाराचे जनक होते. ते कधीही मौनात नव्हते तर ते स्वतःशी संवाद साधायचे, चंपारण्यातील शेतकऱ्यांना सरकार सक्तीने नीळ लागवड करण्यास लावत. त्या विरोधात गांधीजींनी आवाज उठवला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतसाऱ्यातुन व सक्तीने नीळ पिकवण्याच्या अन्यायातून मुक्ती मिळाली. रूग्णसेवा करताना अंतःकरणात नेहमी दया, शांती, प्रेम, करूणा असायला हवी. मन स्वच्छ केल्याखेरीज शांती लाभू शकत नाही. सत्य नाकारता येत नाही हे जगातील अंतिम सत्य आहे, असे महात्मा गांधींचे विचार होते.” असे प्रतिपादन महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या सुमती शहा आयुर्वेद महाविद्यालय, हडपसर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंत मटकर आणि प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विकास आबनावे उपस्थित होते. संस्थेचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे .
यावेळी आयुर्वेदिक महाविदयालयाचे वैदयकिय शाखेचे विदयार्थी, प्राध्यापक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते . डॉ. आबनावे यांनी ‘गांधी: काल आणि आज’ या विषयावर व्याख्यान देत विदयार्थी आणि प्राध्यापकांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत मटकर म्हणाले की “गांधी सर्वानी समजून घ्यायला पाहिजे. गांधी आचरणात आणायचा असेल तर प्रत्येकाने खादीचा वापर केला पाहिजे.” प्रत्येकाने एक तरी खादीचा ड्रेस वापरावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.