पुणे : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवार, दि. 25 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 8.00 ते रात्रौ 8.00 या वेळेत श्री वर्धमान प्रतिष्ठान, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे हे संमेलन होत आहे. भारतीय वन सेवेतील उच्चाधिकारी व पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत शहासने, स्वागताध्यक्षा मंदाताई नाईक, ज्योतीराम कदम व दिंडीप्रमुख उर्मिलाताई कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रकांत शहासने म्हणाले, “या संमेलनाचे उद्घाटन रविवारी (दि. 25) सकाळी 9.35 वाजता होणार आहे. स्वातंत्र्यसेनानी, माजी सैनिक, त्यांचे वारस, निमंत्रित संत व विचारवंत, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते दीपोत्सवाने व अजानवृक्षाचे पूजन करून या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ताताई टिळक, संत अचलस्वामी, पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अधिकारी प्रा. राहुल विश्वनाथ कराड, अॅड. नंदिनी शहासने, सेनादलाचे निवृत्त अधिकारी, वीरमाता, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ज्योतिराम कदम, आनंद हर्डीकर, मनस्विनी प्रभुणे, वन विभागाचे उच्चाधिकारी अनुराग चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी 8.00 वाजता गोखलेनगरमधील वन विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या पटांगणात महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार हभप मणीलालकाका कडघेकर यांच्या शुभहस्ते ग्रंथ व वृक्ष दिंडी पूजनाने दिंडीचा शुभारंभ होईल. या भव्य दिंडीत प्रामुख्याने युवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध सेवाभावी संस्था, माजी सेनाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, वारकरी मंडळे व स्थानिक रहिवाशांचा सहभाग असेल. दिंडीचा उद्देश वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धनातून राष्ट्रभक्तीचा संदेश देण्याचा असून, तशी प्रतिज्ञा व गीत गायन होईल. दिंडी मार्गावर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचे पूजन होईल.”
सकाळी 9.00 वाजता साहित्य संमेलनाच्या ठिकाणी साधु वासवानी मंडपात ग्रंथदालन, क्रांतीकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रदर्शन व परमवीरचक्र चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे ज्योतीराम कदम बीजभाषणातून साहित्य संमेलनाची भूमिका मांडतील. संमेलनात राष्ट्रभक्तीचा अविष्कार, संविधानिक स्वातंत्र्य-स्वैराचार-कर्तव्ये , राष्ट्रभक्ती व प्रसारमाध्यमे, मराठीच्या विविध बोलीभाषांचे राष्ट्रभक्तीसंदर्भात योगदान, सैनिकीकरणात महिलांचे योगदान, वृक्ष लागवड व पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे, अशा विविध सत्रातून जाणकारांची व्याख्याने होणार आहेत.
संमेलनाच्या समारोपावेळी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध सत्रांतून राष्ट्रभक्ती, पर्यावरण संवर्धन, मराठी-कोकणी-अहिराणी-झाडी बोलीभाषांची ओळख होईल. बोलीभाषेतील कवी संमेलनाच्या प्रारंभी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन घोलेरोड प्रभाग समितीच्या अध्यक्षा सौ. स्वाती अशोक लोखंडे यांचे शुभहस्ते होणार आहे.
या संमेलनात सैनिकीकरणाच्या कार्यासाठी बहादूरवाडी येथील मामा देसावळे, स्वातंत्र्यसेनानी कै. मोरेश्वर गोपाळ बवरे व सुशीलाबाई बवरे (मरणोत्तर )जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे शहासने यांनी नमूद केले.
स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, जागतिक तापमान वाढ याविषयी युवकांमध्ये जनजागृती करून जीवसृष्टीला जगण्यालायक वातावरण निर्मिती प्रचार करणे, हे साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट आहे. वृक्ष-पर्यावरण दिंडी व सामाजिक वनीकरणाचा संदेश, स्वातंत्र्यसेनानी व त्यांच्या उत्तराधिकार्यांच्या हस्ते दीपोत्सव, राष्ट्रभक्ती-पर्यावरण-संस्कार- बोलीभाषा विषयक स्मरणिका, पुस्तकांचे प्रकाशन, प्रत्येक विद्यार्थ्यास एक पुस्तक भेट, मराठीच्या बोलीभाषांची ओळख, सांस्कृतिक ग्रंथदालन, मराठीच्या बोलीभाषेतून कवी संमेलन आदी या संमेलनाची वैशिष्ट्य आहेत.
चंद्रशेखर कोरडे, दिवाकर घोटीकर, दत्तात्रय उभे, विजय जोग, पंढरीनाथ बोकारे, प्रा. रेखा पाटील या संमेलनात समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. हे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुर्णत: नि:शुल्क असून संमेलनस्थळी अल्पोपहार/भोजन व्यवस्था नि:शुल्क करण्यात आलेली आहे.

