कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन
स्पाईन फाऊंडेशन”च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन
पुणे : “स्पाईन फाऊंडेशन”च्या वतीने दिनांक १८ आणि १९ जानेवारी रोजी घोले रोड येथील पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, पुणे येथे डॉ. शेखर भोजराज यांनी छायाचित्रण केलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसातपर्यंत दोन दिवस आपल्याला पाहता येणार असून प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. भारतातील ७०% लोकसंख्या हि ग्रामीण भागातील असून अतिशय तोकडया आरोग्यसेवा त्यांना मिळतात. तसेच त्यांनाच पाठीचे आजार होण्याची सर्वाधिक शक्यता असते अश्या रुग्णांना मोफत सेवा मिळावी यासाठी या कला प्रदर्शनच्या माध्यमातून निधी संकलन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शिल्पा भोजराज यांनी दिली.”
या प्रदर्शनाचे उदघाटन दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार असुन पुणे महानगरपालिकेतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्पाईन फांऊंडेशन १९९८ साली डॉ. शेखर भोजराज आणि त्यांच्या पत्नी डॉ. शिल्पा भोजराज यांनी स्थापन केले असून त्यांच्यावतीने ग्रामीण व शहरी भागातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मणके दुखीवर उपचार करण्यात येतात.
स्पाईन फाउंडेशनने आतापर्यंत देशभरात १५ केंद्रांच्या माध्यमातून ३२,३३७ पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत, तसेच १२४१ शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. देशातील पहिले मणक्याच्या विकारांवरही विशेषज्ञ शल्यविशारद डॉ. शेखर भोजराज हे स्पाईन फाउंडेशनसाठी निधी उभा करण्यासाठी कलाकृतींचं प्रदर्शन आयोजित करत आहेत. डॉ. भोजराज यांना लहानपणापासून कलेबद्दल विशेष प्रेम आहे. आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कामाबरोबरच त्यांनी त्यांची कलेची आवडही जोपासली आहे. इंस्टाग्रामच्या लोकप्रियतेमुळे आणि मोबाईल फोनवरील छायाचित्रणामुळे त्यांच्या वैयक्तिक आवडीचं रूपांतर सार्वजनिक झालं आहे. त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी काढलेली छायाचित्रे आणि रेखाचित्रे त्याखाली लिहिलेल्या अप्रतिम कॅप्शनसहित पाहायला मिळतील.