-सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची पानशेत येथे ‘जनसेवा’च्या वृद्धाश्रमाला भेट
पुणे : उतारवयात नातवांच्या संवादाला, त्यांचे लाड करण्याला, आपुलकीने विचारपूस होण्याला आणि कौटुंबिक सुखापासून वंचित राहिलेल्या आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेच; पण डोळ्यात आनंदाश्रूही तरळले. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल अँड ऍडवान्सड स्टडीजच्या (सिवास) विद्यार्थ्यांनी पानशेतजवळील आंबी येथील जनसेवा फाउंडेशन संचालित वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांशी प्रेमाचा संवाद केला.
म्हातारपणात जवळच्या प्रियजनांच्या प्रेमाची आणि आस्थेने होणाऱ्या चौकशीची आवश्यकता असते. हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना करुणा आणि कौटुंबिक मूल्ये समजावीत, यासाठी ‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धित शिक्षण उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमाला भेट दिली. मुलांनी दिलेल्या या भेटीने ज्येष्ठ नागरिक सुखावले. आपल्या नातवंडाना भेटल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. वृद्धाश्रमाचे नियोजन पाहणारे सचिन आणि सोनाली शहा यांनी विद्यार्थ्यांना जनसेवा फाउंडेशन आणि आंबी येथील वृद्धाश्रमाविषयी माहिती दिली. समाजातून मिळणाऱ्या देणग्यांवर चालत असलेल्या या संस्थेने आजवर जवळपास ८० गावे दत्तक घेतले असून, तेथे सामाजिक कार्य सुरु आहे.
सुमारे १५ वर्षांपासून मोदी आजोबा या आश्रमात राहत असून, ते योगा शिकवतात. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही करतात. सकाळी आणि संध्याकाळी एक तास भजन होते. यावेळी आजी-आजोबांसाठी विद्यार्थ्यांनी एक करमणूक कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, खेळ आदींमधून आजी-आजोबाना आनंद दिला. तेथील आजी-आजोबाही मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी त्यांना काही भेटवस्तू भेट म्हणून दिल्या. तंत्रज्ञानाच्या युगात नातेसंबंधांची मूल्ये कमी होत आहेत. या आजी-आजोबांना भेटल्यानंतर त्यांना आधार आणि संवादाची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून सांगितले.
“आजी-आजोबांना भेटून खूप आनंद झाला. मुलांनी आपल्या आई-वडिलांना उतारवयात वृद्धाश्रमात न ठेवता आपल्यासोबत ठेवणे किती महत्वाचे आहे, हे यांना भेटल्यावर प्रकर्षाने जाणवले. कुटुंबाचा आधार बनून आपल्याला मायेने वाढवणाऱ्या आजी-आजोबांना आपण प्रेमाने आणि आपुलकीने जपायला हवे, हीच शिकवण आम्ही घरी परतलो,” असे अक्षय राठोडने सांगितले. तर मानसी सावंत म्हणाली की, जनसेवा फाउंडेशनने हे एक कुटुंब उभारले आहे. या कुटुंबातील प्रेमाने आम्ही सगळेच भारावलो. अनेक आजी-आजोबांच्या जीवनकथा डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत. यातून नातेसंबंध टिकवून ठेवणे आणि आपुलकीची भावना जोपासणे महत्वाचे असल्याची शिकवण मिळाली.