पुणे : “जीवन जगताना स्थैर्य यावे, यासाठी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. आज गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये आयुर्विमा, मुदत ठेवी, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, स्थावर मालमत्ता आदींचा समावेश आहे. आवश्यक ती काळजी घेतली आणि सुरक्षितता बाळगली, तर म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक चांगला पर्याय आहे,” असे मत ‘मनीलिशियस सीक्युरिटीज’च्या पुणे शाखेचे प्रमुख सौमिल चिपळूणकर यांनी व्यक्त केले.
विश्वशक्ती फाऊंडेशनतर्फे भिवपाठकी हॉल, मांडके बिझनेस सेंटर येथे युवकांसाठी ‘अर्थनियोजन आणि बरेच काही’ या विषयावर मार्गदर्शन सत्र पार पडले. यावेळी विश्वशक्ती फाउंडेशनचे चिन्मय फाटक, इन्श्युरन्स तज्ज्ञ कुशल तांबे, विमा प्रतिनिधी प्रज्ञा टापरे, फाउंडेशनचे पदाधिकारी स्वप्नील देशपांडे, निरंजन रांजेकर, पुष्कर लेले, ऍड. सचिन कुलकर्णी, सचिन टापरे, सुनील जोशी आदी उपस्थित होते.
सौमिल चिपळूणकर यांनी म्युच्युअल फंड गुंतवणूक का व कशाप्रकारे करावी? गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल मार्गदर्शन केले. यासह व्यवसायाच्या विविध संधी याविषयी युवकांना मार्गदर्शन केले. कुशल तांबे यांनी गाड्यांचा, मालमत्तेचा विमा उतरवणे किती महत्वाचे आहे, हे सांगितले. आजच्या काळातील आयुर्विमाचे महत्व विशद करून प्रज्ञा टापरे यांनी एलआयसीच्या विविध योजनांची माहिती दिली. चिन्मय फाटक यांनी फाउंडेशनच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

