‘हरी भजन को मान’मधून श्रोत्यांना ‘तेजोमय नादब्रह्म हे’ची अनुभूती
कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीनिवास जोशी, अमोल निसळ यांचे सुरेल गायन
पुणे : ‘रूप पाहता लोचनीं, सुख जाहले वो साजणी’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी’, ‘बाजे रे मुरलिया बाजे’, ‘जाना था गंगापार’ अशा भक्तीमय रचनांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने स्वरनिनाद संस्थेच्या वतीने आयोजित ‘हरी भजन को मान’ या अभंग आणि भजनांच्या सुरेल मैफिलीने रसिक श्रोत्यांना ‘तेजोमय नादब्रह्म हे’ची अनुभूती मिळाली.
पुणे विद्यार्थी गृह संचालित मुक्तांगण न्यू इंग्लिश स्कुलच्या सभागृहात भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचे सुपुत्र आणि शिष्य गायक श्रीनिवास जोशी, पंडित अजय चक्रवर्ती आणि पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे आणि भजनसम्राट अनुप जलोटा यांचे शिष्य अमोल निसळ यांनी सादरीकरण केले. या तीनही दिग्गज गायकांनी सादर केलेल्या भजनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. अत्यंत श्रवणीय अशा या कार्यक्रमातून गुरु-शिष्य परंपरेचा वारसा अनुभवायला मिळाला. भीमसेनजी आणि अनुपजींच्या शैलीची ओळख त्यांच्या जवळच्या शिषोत्तमांकडून श्रोत्यांना ऐकायला मिळाली. यावेळी १३ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंतची महाराष्ट्रातली संत परंपरा अभांगातुन सादर झाली. संत कबीर, मीराबाई, सूरदास, तुलसीदास यांच्यापासून उत्तर भारतातून राजस्थानपर्यंत पसरलेली संत परंपरा अभंग, ओव्या, दोहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गायनातुन अनुभवता आली. ‘भक्ती’ संगीतामधून एकाच नादब्रह्माचा अनुभव श्रोत्यांना मिळाला. ‘ऐसी लागी लगन’ या रचनेचे गायन केले.
प्रशांत पांडव, प्रभंजन पाठक, अभिजित यादव, आलापिनी अमोल यांनी वाद्यांवर साथसंगत केली. पूनम छत्रे त्यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.