पुणे : “रक्तपात करून कोणत्याही विचारवंतांचा विजय होणार नाही. सर्व विचारवंतांनी शांतीच्या मार्गाने चालण्यास सांगितले आहे. सर्व समाजाला प्रगतीपथावर नेण्याचा आणि शांतीचा विचार देणाऱ्या हजरत महमद पैगंबर यांची जयंती वर्षानुवर्षे साजरी केली जाते, पंरतु ती एका जातीपूर्तीच मर्यादित राहिली आहे,” अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी विश्वातील सर्व समुदायाने पैगंबर जयंती साजरी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने बोपोडी येथे हजरत महमद पैगंबर व गुरुनानक जयंतीनिमित्त ‘राष्ट्रपुरुषांच्या दृष्टिकोनातून हजरत महमद पैगंबर यांचे मानवतावादी तत्वज्ञान’ या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी शिवचरित्रकार प्रा. डॉ. यशवंत गोसावी, प्रा. डॉ. महबुब सैय्यद, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, संयोजक परशुराम वाडेकर, सांब सिंग, भुपेंद्र सिंग, शहाबुद्दीन काझी, नगरसेविका सुनीता वाडेकर उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “कोणताही धर्म रक्त सांडायची शिकवण देत नाही. पैगंबर यांनीही हीच शिकवण दिली. नुकताच राम जन्मभूमीचा निकाल लागला. मुस्लिम बांधवांनीही उदार मनाने हा निकाल स्वीकारला आहे. आजही मुस्लिम समाजाकडे काही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. त्यांची मानसिकता बदलायला हवी. हिंदू-मुस्लिम या भेदातून बाहेर पडत माणूस म्हणून आपण जगायला हवे. पैगंबर यांनीही तीच शिकवण दिली आहे.”
प्रा. डॉ. महबुब सैय्यद म्हणाले, “गुलामांना राजकर्ते बनवण्याचे काम पैगंबर यांनी केले आहे. ज्या काळात महिलांना कोणतेही अधिकार व हक्क नव्हते तेदेखील मिळून दिले. शिक्षणाचा अधिकार दिला, जीवनसाथी निवडण्याचा हक्क मिळवून दिला. गुलामांना स्वतंत्र दिले. पैगंबर यांनी नवा समाज निर्माण करण्याचा काम केले. ज्ञानाचे महत्त्व ओळखून त्यांनी शिक्षणासाठी लोकांना प्रोत्साहित केले.”
प्रा. यशवंत गोसावी म्हणाले, “समाजातील सर्व मानवजातीने एकत्र येऊन पुढे जावे, प्रगती करावी, या हेतूने इस्लाम स्थापन झाला आहे. हजरत महमद पैगंबर यांनी सर्व समाजाला योग्य दिशेने नेण्याचे काम केले. शिक्षण, महिलांचे हक्क अशा अनेक गोष्टीवर काम करत त्यांनी समाज समृद्ध केला.”
परशुराम वाडेकर म्हणाले, “संतांनी समाजहिताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. मात्र, काही लोक त्यांच्या विचारांवर टीका करतात. नकारात्मकता पसरवतात, त्याकडे आपण दुर्लक्ष करून त्याचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. हजरत मोहंमद पैगंबर यांनी दिलेला संदेश लक्षात घेणे गरजेचे आहे.” सूत्रसंचालन दीपक मस्के यांनी केले. आभार सुनीता वाडेकर यांनी केले.