रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसोबत दीपोत्सव
पुणे : शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त ठेवण्यात सफाई कामगारांचा वाटा महत्वाचा आहे. त्यांच्यामुळे आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. रोज सकाळी संपूर्ण शहर स्वच्छ करणाऱ्या या सफाई कामगारांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, त्यांचे आरोग्य सदृढ व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे मत नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) (रिपाइं) वतीने आणि नगरसेविका सुनिता वाडेकर व ‘रिपाइं’चे नेते परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘दीपोत्सव आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, आनंद छाजेड, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेन्द्र चव्हाण, जिल्हा युवक आघाडीचे उमेश कांबळे, प्रविण ओव्हाळ, वसंत जूनवने आदी उपस्थित होते. पुणे महानगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा दिवाळीच्या निमित्ताने सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या. आमदारपदी निवड झाल्याबद्दल शिरोळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
परशुराम वाडेकर म्हणाले, “घरची परिस्थिती बिकट होती. झाडू खात्यात नोकरीसाठी खुप प्रयत्न केले. नोकरीसाठी मुकादमाकडे जाऊन बसायचो. पण काम काही मिळाले नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या भावना, व्यथांची जाण आहे.त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. त्याच भावनेतून गेल्या काही वर्षांपासून सत्कार सोहळा व दीपोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद होतो. त्यांच्या अडीअडचणी समजतात आणि त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो.”
प्रकाश ढोरे म्हणाले, “समाजात काम करताना विविध घटकांशी आपला संबंध येतो. समाज आपली दखल घेत असतो. आपणही त्यांची दखल घेऊन काम करणे गरजेचे आहे. आपण न थांबता काम सुरु ठेवले पाहिजे.” सुनीता वाडेकर म्हणाल्या, “आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या पाल्याकडेही आमचे लक्ष असते. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवत असतो. तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केलेले आहेत.”
प्रभागातील सर्व सामाजिक राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन विजय ढोणे यांनी केले. आभार सुनीता वाडेकर यांनी मानले.