पुणे : “आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मोबाईलसारख्या उपकरणाच्या मदतीने अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. तेव्हा शिक्षकांनी अधिकाधिक ‘स्मार्ट’ होत अध्यापन करावे. ज्ञानार्जन करताना त्याला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर आणि आनंददायी होईल,” असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्मार्ट क्लासरूमचे’ उद्धाटन विवेक सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. माजी प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश वळवडे यांच्या समरणार्थ देवकी वळवडे यांच्या तसेच प्रा. अरविंद म्हसकर, ज्योत्स्ना म्हसकर यांच्या देणगीतून ही स्मार्ट क्लासरूम उभारण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक राजेंद्र कडूसकर, संचालक आनंद कुलकर्णी, देवकी वळवडे, म्हसकर यांच्या भगिनी नीला पेंडसे, प्राचार्य डॉ. योगेश नेरकर, उपप्राचार्या डॉ.कल्याणी कुलकर्णी आदी उपस्थित होते. रोबोटिक्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटच्या मदतीने स्मार्ट क्लासरूमचे’चे उद्धाटन झाले. या स्मार्ट क्लासरूपच्या माध्यमातून संस्थेच्या नाशिक येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत तसेच जपान येथील माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला.
विवेक सावंत म्हणाले, “महाविद्यालयात ‘स्मार्ट क्लासरूम’ची सुरवात करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. यामुळे संस्थेच्या विविध महाविद्यालयाती प्राध्यापक विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. प्रवास न करता महाविद्यायात ‘रिमोट’ च्या सहायाने विषय शिकविला जाईल. वर्गात जास्ती जास्त शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. नवमाध्यमांचा नवतंत्रज्ञानाची वापर आपण सर्वजण करतो, याचा उपयोग शिक्षणप्राक्रियेत करून घेणे आवश्यक आहे. आपण वापरत असलेल्या स्मार्ट फोन मध्ये अडीचलाख पेटंट आहेत. याचा उपयोग अध्ययन अध्यापन प्रक्रियेत करता येईल. तेव्हा स्मार्ट क्लासरूम अधिकाधिक स्मार्ट करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी देखील तुम्ही नेमके कोण आहेत, कोणत्या गोष्टीत तुम्हाला गती आहे हे ओळखून पुढची वाटचाल करावी. पुस्तकी ज्ञान सोबतच आवांतर ज्ञान घेण्याकडे भर द्या. तुमची स्पर्धा आर्टिफिशल इंटेलिशन्स सोबत आहे हे लक्षात घेऊन पुढे पाऊल टाका.”
वळवडे म्हणाल्या, ”अविनाश वळवडे हे नेहमी भविष्याचा विचार करायचे म्हणून त्याच्या समरणार्थ स्मार्ट क्लासरूम साकारण्यात आली याचा आनंद आहे. ते शिक्षण क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेह्मीची झटत राहिले. विद्यार्थ्यांनी या स्मार्ट क्लासरूमच्या मदतीने शिक्षण घेत प्रगती करावी. स्मार्ट क्लासरूमच्या रूपाने त्यांचे शिक्षणकार्य निरंतर सुरु राहील.”
सुनील रेडेकर यांनी स्मार्ट क्लासरूप संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्न आणि योगदान विषयी माहिती सांगितली. प्रा. वैदही सोहनी, प्रा. निकिता चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. योगेश नेरकर यांनी आभार मानले.