विजयकांत कोठारी यांना ‘समाजशिरोमणी’, पृथ्वीराज धोका यांना ‘समाजभूषण’,
नीता घोडावत यांना ‘समाजरत्न’, तर भारती भंडारी यांना ‘मानवसेवा’ पुरस्कार
विठ्ठलशेठ मणियार, ज्ञानेश्वर मुळे, रझा मुराद, सोनाली कुलकर्णी, प्रा. दराडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
पुणे : ‘सूर्यदत्ता’ संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रमिलाबाई व नौपतलालजी सांकला या दाम्पत्यास जाहीर झाला आहे. विजयकांत कोठारी यांना ‘समाजशिरोमणी’, पृथ्वीराज धोका यांना ‘समाजभूषण’, नीता घोडावत यांना ‘समाजरत्न’, तर भारती भंडारी यांना ‘मानवसेवा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या शनिवारी (दि. ७ सप्टेंबर २०१९) सायंकाळी ५.०० वाजता गंगाधाम चौक, बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक भवनात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी जैन, गुजराती, माहेश्वरी व अगरवाल समाजातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे, अशी माहिती बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया व सचिव सिद्धांत चोरडिया यांनी दिली.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “दरवर्षी हा पुरस्कार माझ्या आईवडीलांसमान सासूसासरे रतनबाई व बन्सीलाल चोरडिया यांच्या स्मरणार्थ जैन समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना चातुर्मासामध्ये जैन गुरु महाराजांच्या सान्निध्यात दिला जातो. हे दोघेही जैन धर्माचे सर्व तत्व पालन करणारे, भारतीय संस्कृतीला मानणारे आणि सर्व समाजाच्या हितासाठी कार्यरत होते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांचे स्मरण करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलशेठ मणियार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. समाजातील दहावी-बारावी व उच्च (ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅजुएट) शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.”
“नौपतलाल सांकला यांनी साठ वर्षांहून अधिक काळ मिठाचा व्यवसाय करीत मुलांना घडवले. आज त्यांची राजेश आणि रवी ही दोन्ही उद्योग क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत आहेत. राजेश सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही मोलाचे योगदान देत आहेत. सामाजिक-धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात विजयकांत कोठारी यांचे काम उल्लेखनीय आहे. पृथ्वीराज धोका गेली ५० वर्षे व्यावसायिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नीता घोडावत संजय घोडावत ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक-शैक्षणिक, धार्मिक कार्य करत आहेत. पती विजय भंडारी यांच्या मानवसेवेच्या प्रत्येक कार्यात सहभागी होणाऱ्या भारती भंडारी यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे,” असे सुषमा चोरडिया यांनी सांगितले.