पुणे : “सनदी लेखापालांना आजच्या काळात अनन्यसाधारण महत्व आले असले, तरी जबाबदारीही तेवढ्याच प्रमाणात वाढलेली आहेत. सनदी लेखापालाने केवळ नोंदी ठेण्यापुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशक ज्ञान, जागतिक घडामोडी, कामगार कायदे व आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवून कार्यरत असायला हवे. कारण देशाच्या प्रगतीत सनदी लेखापालाची भूमिका महत्वाची आहे,” असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले.
बाणेर येथील बंटरा भवन येथे द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने सनदी लेखापाल परिक्षा उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभात गिरीश बापट बोलत होते. यावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, डॉ..शिवाजी झावरे, सीए आनंद जाखोटिया, एस. जी. मुंदडा, सीए उमेश शर्मा, पुणे शाखेच्या अध्यक्ष सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सचिव समीर लड्ढा, खजिनदार यशवंत कासार, काशिनाथ पाठारे, पत्रकार सुनील माने आदी उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले, “सनदी लेखापाल बनण्यासाठी लागणारी गुणवत्ता तुमच्यात आहेच. परंतु देशहिताच्या दृष्टीने इतरांना मार्गदर्शन व आर्थिक सल्ला देतांना निडरपणे दिला जावा. यामुळे तुमची भूमिका योग्यपणे मांडून चुकीच्या गोष्टींना आळा बसून तुमच्या ज्ञानाचा वापर आर्थिक विकासासाठी होईल. नवी पिढी देशाच्या विकासासाठी नक्कीच सकारात्मक कार्य करील.”
डॉ. शिवाजी झावरे म्हणाले, “विविध शाखेतील विद्यार्थी आज वाणिज्य शाखेकडे वळत आहेत. यामुळे सनदी लेखापाल या व्यवसायाची परिभाषा बदलली आहे. लेखापाल हा आजच्या काळातील डॉक्टर, वकील, अभियंता या सर्वांचा आर्थिक सल्लागार असल्याने त्याने कठोर परिश्रम, जिद्द आणि सचोटीने काम करणे गरजेचे आहे.”
सीए चंद्रशेखर चितळे यांनी प्रास्ताविकातून पदवीदान संदर्भात माहिती दिली. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. ऋता चितळे यांनी आभार मानले. करण चांदवाणी व राजश्री यांनी सूत्रसंचालन केले.