पुणे : भिजवलेल्या मातीला आकार देत सुबक गणेशमूर्ती साकारण्याचा अनुभव सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या टिळक रस्त्यावरील इंटिरिअर डिझाईन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला. शाडूच्या मातीपासून आखीवरेखीव बाप्पा बनवत विद्यार्थ्यांनी त्याची प्राणप्रतिष्ठापना संस्थेत व घरी करण्याचा संकल्प केला. प्रसिद्ध मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण मूर्ती बनवत प्रदूषणमुक्ती आणि बाप्पांची विटंबना टाळण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेतून दिला. विद्यार्थी-शिक्षकांच्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी कौतुक केले.
धोंडफळे यांनी शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेतली. सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यामध्ये उत्स्फूर्त भाग घेतला. विघटन न होणारे पीओपी म्हणजे काय? पर्यावरणाला ते का हानिकारक आहे आणि आपल्याच बाप्पाचे अर्धवट विघटन झालेले विदारक रुप किती आणि कसे अयोग्य आहे? हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सोशल मीडियावर जागरूक असणाऱ्या तरुणाईला प्रत्यक्ष पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचा हा उपक्रम महत्वाचा ठरला. अशा पर्यावरणपूरक मूर्ती बनवल्या तर बाप्पांच्या विसर्जनानंतर मूर्तीचे विघटन होईल, तसेच पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, असा विचार प्राचार्य अजित शिंदे यांनी मांडला. दरवर्षी अशा प्रकारचे शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती बनविण्याची कार्यशाळा नियमितपणे घेतली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.