सलग २५ तास करणार देशभक्तीचे जागरण
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने आयोजन; शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी होणार सहभागी
पुणे : ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने ‘सूर्यदत्ता काव्यथॉन २०१९’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सलग २५ तास देशभक्तीपर गाणी, कवितांचे सादरीकरण होणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी स्वयंप्रेरणेने यामध्ये सहभागी होणार असून, संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये हा कर्यक्रम होणार आहे, असे ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. या उपक्रमाची नोंद ‘गोल्डन बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सल्लागार सचिन इटकर, संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्राचार्य अजित शिंदे, नूतन गवळी आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “संस्थेशी संलग्नित प्रत्येक विद्यालय यात सहभागी होत असून, फँशन टेक्नॉलॉजीतर्फे ‘विविधतेतून एकता’ संकल्पनेवर फँशन शो आयोजिला आहे. भारतातील विविध राज्यांची प्रादेशिक वेशभूषा, ‘स्वदेशी’ संकल्पनेत खादीपासून बनवलेले, भरतकाम केलेले कपडे, तसेच आधुनिक कपड्यांच्या साहाय्याने रेखाटलेला तिरंगा ध्वजाचे यांचे सादरीकरण पहावयास मिळणार आहे. यासाठीची सर्व सामुग्री विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे. ‘वॉक द हीरो’मधून स्वातंत्र्यलढ्यातील प्रभावशाली व्यक्तींचे दर्शन घडणार आहे. हातमागावरील साड्या परिधान करून विद्यार्थिनी रॅम्पवाक करतील. यासह राखी बनवणे, मेहंदी/रांगोळी काढणे, ज्वेलरी बनविणे, पोस्टर बनवणे अशा विविध उपक्रमांची जोड या कार्यक्रमाला असणार आहे. इंटिरियर डिझाइनचे विद्यार्थी कॅनव्हासवर लाइव्ह पेंटिंग, देशभक्तीविषयक पोर्ट्रेट काढणार आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी वैविध्यपूर्ण पाककला संस्कृती दाखवतील. व्यवस्थापनाचे विद्यार्थी ‘स्टेट इकॉनॉमी एक्स्पो’, डिफेन्स एक्स्पो भरविणार आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटचे विद्यार्थी संस्थेचा परिसर सजवणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी स्वातंत्र्यपूर्व-स्वातंत्रोत्तर काळातील प्रभावशाली व्यक्तींवर माहितीसह फोटो प्रदर्शन भरविणार आहेत. त्याचबरोबर विज्ञान, क्रीडा, राजकारण, मनोरंजन, कृषी, समाजकारण अशा विविध क्षेत्रातील नामांकीत आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या व्यक्तींचे ‘ब्रँड्स ऑफ इंडिया’ प्रदर्शन भरविणार असल्याचे डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.
सचिन इटकर म्हणाले, “स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारा हा अनोखा उपक्रम सूर्यदत्ताने हाती घेतला आहे. त्यामुळे दोन दिवस सूर्यदत्ता संस्थेचा परिसर देशप्रेमाने भारावून जाणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासह त्यांच्यात सामाजिक भान आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. ‘काव्यथॉन’मधून क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवरील सैनिकांच्या बलिदानाची आठवण व्हावी, त्यांच्याप्रती आदर निर्माण व्हावा, त्यातून विद्यार्थ्यांना एकात्मतेचे महत्व समजावे, या उद्देशाने दोन दिवसांचा उपक्रम आयोजिला आहे. सलग २५ तास गाण्यांतून, कवितांमधून देशप्रेमाचे जागरण करण्याची ही पहिलीच वेळ असावी. संस्थेतील बारा विद्याशाखांमधील विद्यार्थी एकमेकांशी समन्वय साधून आपल्या क्षेत्राशी संबंधित काम करणार आहेत. त्यामुळे त्यांना प्रात्यक्षिक, तसेच आयुष्यातील अविस्मरणीय उपक्रम राबविल्याचा अनुभव मिळणार आहे.”
पूरग्रस्त भागातील ७२ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार : डॉ. चोरडिया
कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागातील ७२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट स्वीकारणार आहे. या पूरग्रस्तांना सगळीकडूनच मदतीचा हात दिला जात आहे. त्यामध्ये आर्थिक मदतीबरोबरच कपडे, अन्नपदार्थ, औषधे यासह जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. परंतु, या पुरामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही वाहून गेले आहे. त्यामुळे या भागातील एकूण ७२ मुलांच्या शिक्षणाचा खर्च सूर्यदत्ता संस्थेकडून केला जाणार आहे. त्यांना संस्थेत प्रवेश देऊन मोफत शिक्षण व निवास व्यवस्था केली जाणार आहे, असे डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. पुण्यातील इतर शैक्षणिक संस्थांनीही सूर्यदत्ता संस्थेप्रमाणे पुढाकार घेऊन पुरग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणास हातभार लावावा, असे आवाहन सचिन इटकर यांनी केले.