अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-
पुणे : “बुद्धिवादी ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी व्यवसायात उतरून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. आज ब्राह्मण महासंघाच्या विविध आघाड्यांमार्फत समाजाला सक्षम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आर्थिक सक्षम होण्याबरोबरच संस्कार टिकवून ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमतेसह संस्कारवृद्धीवर ब्राह्मण समाजाने भर द्यावा,” असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पंडित वसंतराव गाडगीळ, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नानासाहेब चितळे, भाजप नेत्या शोभा उपाध्याय, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रदेशाध्यक्ष उदय महा, प्रवक्ता संदीप खर्डेकर व जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात ब्राह्मण उद्योजकांचे प्रदर्शन आयोजिले असून, त्याचेही उद्घाटन मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले.
गोविंद कुलकर्णी म्हणाले, “समाजाच्या उत्कर्षासाठी केवळ सरकारवर विसंबून राहून चालणार नाही. आपण प्रत्येकाने आपल्या परीने समाजाच्या हितासाठी योगदान दिले पाहिजे. उद्योग, महिला, वकील आणि अशा एकूण ३२ आघाड्या समाजासाठी काम करताहेत, ही आनंदाची बाब आहे. तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे व समाजातील इतरांना बरोबर घेऊन समाज सदृढ होण्यासाठी योगदान द्यावे. हे करताना आपल्या मूल्यांचा, संस्कारांचा विसर पडू देऊ नये.”
पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले, “तपश्चर्या, त्याग, समर्पण या जोरावर ब्राह्मण समाजाने आजवर आपली प्रगती केली आहे. अधिकाधिक ज्ञान आत्मसात करून समाजबांधवांच्या उत्कर्ष होईल, या दृष्टीने आपले काम करावे.” मुक्ता टिळक यांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेटी देऊन उद्योजकांना प्रोत्साहित केले. प्रास्ताविक उदय महा यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.