पुणे : “विद्यार्थ्यांमधील नावीन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ अनेक उपक्रम हाती घेत असून, इनोव्हेशन पॉलिसी तयार करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आवश्यक संसाधनांअभावी त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे इनोव्हेशनला अधिक वाव असलेल्या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्व विद्यापीठात आणि महाविद्यालयात इनोव्हेशन, आंत्रप्रेन्युअरशीप, ‘स्टार्ट अप’ सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहोत,” असे प्रतिपादन मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मुख्य इनोव्हेशन अधिकारी डॉ. अभय जेरे यांनी केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय (एमएचआरडी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) यांच्या सहकार्याने दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एआयटी) आयोजित नवकल्पनांच्या आढाव्यासाठी (प्रुफ ऑफ कॉन्सेप्ट) ‘एमएचआरडी-एआयसीटीई रिजनल मेन्टॉरिंग’ कार्यक्रमावेळी डॉ. अभय जेरे बोलत होते. ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल 2.0’ आणि ‘अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (एआरआयआयए) 2020’ या विषयावर मार्गदर्शन सत्रे झाली. यावेळी ‘एआयसीटीई’ स्टार्टअप कमिटीचे चेअरमन संजय इनामदार, उपसंचालक डॉ. मधुकर वावरे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, कौन्सिलचे राष्ट्रीय समन्वयक दिपान साहू, विभागीय समन्वयक पंकज पांडे, मनुष्यबळ विकास मंत्रालयातील इनोव्हेशन अधिकारी सरिम मोईन यांच्यासह एंटरप्रेन्युअरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. सत्या रंजन आचार्य आदी उपस्थित होते.
डॉ. अभय जेरे म्हणाले, “आपल्याकडे अजून इनोव्हेशन संस्कृती रुजायला वेळ लागेल. त्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर आम्ही विविध गोष्टी राबविण्याचा प्रयत्न करतोय. इनोव्हेशन कौन्सिलच्या माध्यमातून आम्ही देशाला उपयोगी पडतील, अशी इनोव्हेशन शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. खासगी व शासकीय संस्थांना इनोव्हेशन, संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (एआरआयआयए) सारखी योजना सुरु आहे. चार-साडेचार संस्था आता इनोव्हेशन प्रक्रियेत जोडल्या गेल्या आहेत. मुलांमध्ये कौशल्य विकसित होण्याला, नवकल्पनांना प्रोत्साहन देत आहोत. डिझाईन थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंगवर काम सुरु आहे. उच्च शिक्षणात प्रात्यक्षिकाधारित अभ्यासक्रम आणण्याचा विचार सुरु आहे. आव्हाने शोधून, त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी स्मार्ट इंडिया हाकेथॉनसारखी स्पर्धा आम्ही भरवत आहोत. इसरो, आयुष, जलसंवर्धन व स्वच्छता अशा अनेक क्षेत्रात वेगवेगळी इनोव्हेशन्स होत आहेत. बौद्धिक संपदा, स्वामित्व हक्क, रेव्हेन्यू मॉडेल यावरही काम सुरु आहे.”
संजय इनामदार म्हणाले, “ग्रामीण भागातील नऊवारी नेसणाऱ्या महिलांमध्येही वेगळ्या कल्पना आहेत. त्यालाही चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यपाल, कुलगुरूंच्यामार्फत जवळपास १७ राज्यांमध्ये इनोव्हेशन संस्कृती विकसित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संसाधने आणि दृष्टीकोन असे दोन आव्हाने आज आहेत. ग्रामीण भागात संसाधनांचा, तर शहरी भागात दृष्टीकोनाचे आव्हान आहे. चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याचा दृष्टीकोन विकसित व्हायला हवा. भारताच्या विकासात माझे योगदान असावे, या भावनेतून विद्यार्थी आणि शिक्षकांनी काम केले पाहिजे. आज त्यापद्धतीने काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशीप विकसित होत आहे.”
ब्रिगेडियर अभय भट म्हणाले, “आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये हा कार्यक्रम होत असल्याने आमच्या विद्यार्थ्यांना इनोव्हेशन, संशोधन करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आमच्याकडे अनेक विद्यार्थी उपयोजित संशोधन करताहेत. स्मार्ट हाकेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये आर्मी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यापुढेही संस्थेत विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना संशोधन, इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशीपसाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत.”
दिपान साहू, पंकज पांडे, सरिम मोईन, डॉ. सत्या रंजन आचार्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र व गोवा विभागातील १५० हून अधिक विद्यार्थी, तर १०० पेक्षा अधिक शिक्षक सहभागी झाले होते. दीपशीखा , शिवमकुमार या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. अभय भट यांनी आभार मानले.