पुणे : भारतरत्न जे. आर. डी टाटा यांच्या जन्मदिनी (२९ जुलै २०१९) साजरा होत असलेल्या २६ व्या आंत्रप्रेन्युअर्स दिनानिमित्त आंत्रप्रेन्युअर्स क्लब ऑफ पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी आणि बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशीप पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

रेणुका इंजिनिर्सचे महेंद्र पाटील (आंत्रप्रेन्युर), सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व्हिसेसचे अजिंक्य कोट्टावर (रिसर्च अँड इनोव्हेशन), राणा हॉस्पिटॅलिटीच्या भाग्यश्री जाचक (सर्व्हिस इंडस्ट्री), सांगलीतील रोझ हायटेक ऍग्रो फार्मचे तानाजीराव चव्हाण (आउटस्टँडिंग वर्क इन ऍग्रीकलचर), कृष्णा डायग्नोसिस्टच्या पल्लवी जैन (सोशल रिलेव्हन्स), मानसी करंदीकर व केतकी घाटे (ग्रीन एंटरप्राइज) यांच्यासह हिंदुस्थान कॅटल फीड्सचे सचिन माने यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सोमवारी (ता. २९) सायंकाळी ५.०० वाजता जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे हा सोहळा होणार आहे. सुदर्शन केमिकल्सचे अध्यक्ष प्रदीप राठी यांच्या हस्ते या पुरस्करांचे वितरण होणार असून, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई एक्सचेंजचे प्रमुख अजय ठाकूर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. क्लबचे सचिव डॉ. आशिष तवकर, खजिनदार सुनील थोरात, बारामती क्लबचे अध्यक्ष भाऊसाहेब तुपे, पीसीएमसी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र कुलकर्णी, पुणे फास्ट क्लबचे सुभाष माईनकर, निगडी क्लबचे अध्यक्ष सागर दाणी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आंत्रप्रेन्युअर्स क्लबचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांनी दिली.

