पुणे : “फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ म्हणजे मृत आहारच आहे. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पालेभाज्या लवकर खराब होतात आणि अश्या भाज्यांमधून शरीराला आवश्यक घटकदेखील मिळत नाहीत. त्यामुळे फ्रीजचा वापर कमी करावा. आज सर्वजण आरोग्यविषयी विविध माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात, परंतु त्या आलेल्या माहितीवरून कोणत्याही क्रिया करू नयेत, कारण ती अचूक माहिती असेलच असे नाही,” असे प्रतिपादन आयुर्वेदिक तज्ञ डॉ. प्रिया धर्माधिकारी यांनी केले.
मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित ‘बदलती जीवनशैली–तणाव व वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष विनय र.र., प्रा. नीता शहा, डॉ. संगमनेरकर, प्राध्यापक देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रिया धर्माधिकारी म्हणाल्या, “कोणतीही भाजी किंवा अन्नपदार्थ गरम असल्यापासून ते थंड होईपर्यंत म्हणजे जवळपास तीन तासांपर्यंत ताजे असतात. तीन-चार तासाच्या पुढे ते अन्न शिळे होते. असे अन्न आपण खाणे टाळले पाहिजे. अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नये. त्यामुळे त्या पदार्थाचे सर्व घटक नाहीसे होऊन जातात. आपण एखाद्या मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये जातो, तिथे बरेच पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ असतात, अशा खाद्यपदार्थांची खरेदी करणे टाळावे, कारण ते पदार्थ कित्येक दिवसाचे आणि ते पदार्थ शिळे झालेले असतात, अशा पदार्थांना आपण बळी पडू नये.”
“जेवण आणि टीव्ही यांचा संबंध सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आयुर्वेद म्हणते मन लावून अन्नपदार्थांचे सेवन करावे. कारण या वेळी आपल्या शरीरातील पाचक स्राव अन्न प्रक्रिया व पचन करण्यासाठी तयार झालेले असतात. अन्नपदार्थांचे सेवन करताना बडबड करू नये किंवा हसू नये हे एक पवित्र क्रिया आहे. चिंता क्रोध भय निद्रानाश या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि आपली कार्यशक्तीदेखील मंदावते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक नीता शहा यांनी प्रास्ताविक केले. विनय र. र. यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून आभार मानले.