अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक
डॉ. कल्याण गंगवाल यांचे स्पष्टीकरण; अंडे मांसाहारी असल्याचा दावा
पुणे : ”कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, अशी मागणी अतिशय चुकीची असून, अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक आहे,” असे स्पष्ट मत सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले. आयुष मंत्रालयाने कोंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घोषित करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी नुकतीच राज्यसभेत केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गंगवाल बोलत होते.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “ज्या पेशीला सेल मेम्ब्रेन असते, तो पदार्थ मांसाहारी असतो. ज्या पेशीला सेलवॉल असते तो शाकाहारी, अंड्याला सेल मेम्ब्रेन आहे. त्यामुळे ते मांसाहारी आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ते कोंबडीच्या गर्भाशयातून येते. प्रत्येक फलित वा अ-फलित अंड्यात जिवंत स्त्रीबीज असते. अंड्याच्या कवचावर १५००० सूक्ष्म छिद्रे असतात त्यातून आतील स्त्रीबीज श्वासोच्छवास करत असते. अंडे इन्क्युबेटरमध्ये ठेवले असता, ते ऑक्सिजन घेते, हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. पूर्वी भाजीवाल्यांच्या दुकानात अंड्याची विक्री जात होती. आम्ही ऍडव्हर्टायझिंग कौन्सिलकडे तक्रारी केल्या. त्यांनीही अंडे मांसाहारी असल्याचे मान्य केले होते. अफलित अंडी शाकाहारी म्हणून विकणे सामाजिक गुन्हा असल्याचा निकाल एडव्हर्टायजिंग स्टँडर्ड्स कौंसिल ऑफ इंडियाने (भारतीय विज्ञापन मापक परिषद) २६ में १९९० रोजी दिला आहे, हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे.”
डॉ. गंगवाल पुढे म्हणाले, “अंड्याची तुलना स्त्रीच्या राजोधर्माशी करता येईल. अंडी ही गर्भरज व योनीजन्य पदार्थ आहे. स्त्रीच्या प्रत्येक मासिक पाळीत एक स्त्रीबीज बाहेर पडत असते. तसेच कोंबडीच्या प्रजनन प्रक्रियेत कोंबडीचे स्त्रीबीज अंड्याच्या रूपाने बाहेर पडते. ज्यांना नराचा संकर झाला नाही, त्या अफलित अंड्याना शाकाहारी म्हणणे अवैज्ञानिक आहे. अफलित अंड्यातदेखील जिवंत स्त्रीबीज असते. त्यामुळे त्याला शाकाहारी म्हणणे चुकीचे आहे, असा निष्कर्ष शास्त्रज्ञ पीटर रॉम्पकीन्स क्रिस्तोर यांच्या द सिक्रेट लाईफ ऑफ प्लॉट्स या पुस्तकात आहे.”
“अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक राजकारण आणि खेळी आहे. आम्ही शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित विरोध करणार आहोत. अर्थनीतीवर आधारित, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातबाजीच्या तंत्राने अंडी शाकाहारी, पौष्टिक आणि आरोग्याला उत्तम असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. त्याची खरच गरज आहे का? ज्यावेळी अंडी झाडाला लागतील किंवा जमिनीत उगवतील तेव्हा आपण त्याला शाकाहारी नक्की म्हणू. तोवर मात्र अंडे हे मांसाहारी आहे, हेच सत्य आहे.”
काय होतात आजार
अंड्याच्या सेवनामुळे सालमोनेला (टायफॉईडचा ताप), ऍलर्जी, सर्दी, दमा, त्वचारोग, फूड पॉइजनिंग, पचन प्रक्रियेत बिघाड आदी आजार बळावतात. अनेक घातक अंश शरीरात येत असल्याने ह्रदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. अंडी शाकाहारी नाहीत. अफलित अंड्यातील जिवंत स्त्रीबीजाला आपण मारतो. अशा हिंसक आहारामुळे मानसिक आरोग्यही बिघडते.