पुणे : भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने १०८ सेवाशाखा संकल्पपूर्ती सत्कार व केशायुर्वेद पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवार, दि. १९ जुलै २०१९ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे हा सोहळा रंगणार आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश डुंबरे, बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, भारत विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्ताजी गायकवाड आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
गेल्या तीन वर्षात केशायुर्वेदच्या देश-विदेशात १०८ सेवा शाखा उभारल्या आहेत. त्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रप्रमुखाना केशायुर्वेद गौरव, भूषण, रत्न आणि मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘काया-केश कल्पना’ आणि केशायुर्वेद गौरवग्रंथांचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती केशायुर्वेदचे संचालक डॉ. हरिश पाटणकर यांनी दिली आहे.