पुणे : मराठी उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी कार्यरत मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरमच्या (एमईएन) चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन व आदर्श उद्योजक-द्योजिका पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रविवार, दि. २३ जून २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती फोरमचे सुरेंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजेश जोशी, नंदकुमार तळेकर, वृषभनाथ कोंडेकर, स्वप्नील मोकाशी, शिवाजी बिराजदार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित मोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सेवा क्षेत्रातील जीवन हेंद्रे, उत्पादन क्षेत्रातील प्रकाश दीक्षित, कृषी उद्योगातील उत्तम हुकरे यांना आदर्श उद्योजक, तर उत्पादन क्षेत्रातील उज्ज्वला गोसावी व खाद्य क्षेत्रातील प्राजक्ता पाठक यांना आदर्श उद्योजिका पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे
मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम मराठी उद्योजकांनी मराठी उदयोजकांसाठी तयार केलेले व्यासपीठ आहे. विविध व्यवसायातील लोकांशी देवाणघेवाण करून व्यवसायाची व्याप्ती वाढविणे, या विचारांतून फोरम काम करत आहे. फोरमतर्फे महिन्याला सभासदांची बैठक घेऊन उद्योजकांना एकमेकांशी जोडले जात आहे. उद्योजकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, असेही देशपांडे यांनी नमूद केले.
मराठी व्यावसायिकांना आपला उद्योग वाढवावा, यासाठी फोरमच्या वतीने २३, २४ आणि २५ ऑगस्ट या कालावधीत उद्योगांचे प्रदर्शन आयोजिले आहे. अधिकाधिक मराठी व्यावसायिकांनी या प्रदर्शनात सहभाग घ्यावा, असे आवाहन राजेश जोशी यांनी केले आहे.

