पुणे : भगवान महावीर स्वामी यांच्या २६१८ व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त पुण्यातील जय आनंद ग्रुप व महावीर फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने धान्यदान उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘धान्यदान करा, दुप्पट पुण्य कमवा’ हा संदेश देत भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणाक महोत्सवानिमित्त आयोजित शोभायात्रेतून नागरिकांना धान्यदानाचे आवाहन करण्यात आले. धान्य खरेदीसाठी शोभायात्रा मार्गावर अनेकांनी रोख देणगी देऊन उपक्रमात सहभाग घेतला. एकूण दहा हजार किलो धान्य आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथावर संकलित झाले. हे धान्य दिव्यांग व विशेष संस्थांना, तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मोफत देण्यात येणार आहे.
गुरुवार पेठेतील जैन मंदिरापासून ही शोभायात्रा निघाली. बाबू गेनू चौक, सिटी पोस्ट, नानापेठ मार्गे शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू सभागृहातपर्यंत निघालेल्या शोभायात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते. राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य आनंदऋषीजी पुण्य प्रदान रथावरून अंध, अपंग, अनाथ, वंचित, महिला बाल आश्रमासाठी हे १० हजार किलो धान्य संकलन करण्यात आले. आजवर महावीर फूड बँकेने ५ लाख ११ हजार किलो मोफत धान्याचे वितरण करण्यात आले आहे. प्रमोद शांतीलाल छाजेड यांनी ११०० किलो धान्य या उपक्रमाला दिले.
महावीर फूड बँकेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा व संस्थापक अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला असून, सौ. प्रमिलाबाई नौपतलालजी सांकला व श्रीमती विमलबाई बंडूलालजी भंडारी यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले. या उपक्रमात विजयकुमार मर्लेचा यांच्यासह उपाध्यक्ष शांतीलाल देसरडा, जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष शांतीलाल नवलाखा, अशोक लोढा, विजय चोरडिया, गुलाबचंद कवाड, अँटी करप्शन कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत फाळके व जय आनंद ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

