पुणे : ओवायई फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या सिमरन जेठवानी यांना फ्रान्स दूतावासाकडून समाजकार्याबद्दल मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. फ्रान्स दूतावासातील अधिकारी जॉन थॉमस आणि मिसेस युनिव्हर्स नेहा त्यागी यांच्या हस्ते सिमरन जेठवानी यांचा नुकताच पीएचडी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
वयाच्या नवव्या वर्षापासूनच समाजकार्यात जोडून घेतलेल्या सिमरन अनेक संस्थांबरोबर काम करीत आहेत. बीकॉम, डीटीएल, एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या सिमरन जेठवानी टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम, क्रिप्स फाऊंडेशन, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, सिंधी समाज संस्था अशा विविध संस्थांच्या माध्यमातून जेठवानी सामाजिक कार्य करीत आहेत. स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती उपक्रमाच्या दोन विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
यासह सिमरन जेठवानी गेल्या अनेक वर्षांपासून अंध मुलांसाठी काम करताहेत. बिहारमध्ये लष्करासोबत त्यांनी दुष्काळ निवारणासाठी काम केले. साधू वासवानी मिशनमध्ये त्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर माळीन गावात कलाग्राम वसवण्यात तसेच हेमलकसा येथील बाबा आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पात त्यांनी योगदान दिले आहे. शिक्षण, आरोग्य, मुलगी वाचवा अशा अनेक सामाजिक कार्यात त्या हिरीरीने सहभाग घेतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत फ्रान्स दूतावासाकडून त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. या गौरवाबद्दल डॉ. सिमरन जेठवानी यांनी आनंद व्यक्त केला असून, या सन्मानाने आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशी भावना व्यक्त केली.

