बहारदार रागदारीने स्वरोत्सवाला सुरुवात -सानिया पाटणकर यांचे गायन; रईस खान, दीपक भानुसे यांच्या सितार-बासरीची जुगलबंदी
पुणे : अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार करणाऱ्या स्वरनिनाद संस्थेतर्फे आयोजित गंगाधर स्वरोत्सवाला बहारदार रागदारीने सुरुवात झाली. प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांनी नंद रागात ‘ढूंढ बन सैया’ ही विलंबित बंदिश आणि ‘मोहे करन दे बतिया’ दृत बंदिशीने गायनाला सुरुवात केली. त्यानंतर कर्नाटक बसंत रागातील ‘सरसा सुगंध फुल खिले’ या बंदिशीसह सादर केलेल्या ‘कैसी कटे बरसात रे’ कजरी रागाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नीलेश रणदिवे (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), ईश्वरी श्रीगार व सुगंधा उपासनी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
यंदा स्वरोत्सवाचे चौथे वर्ष आहे. सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्रात हा स्वरोत्सव रविवारपर्यंत (दि. २०) रंगणार आहे. सानिया पाटणकर यांच्या सुरेल गायनानंतर रईस खान यांच्या सितारवादनाने, तर दीपक भानुसे यांच्या बासरीवादनाने कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी गायक अमोल निसळ, स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ, ऍना कंस्ट्रक्शनचे अल्पना अन्नछत्रे, अर्चिस अन्नछत्रे व प्रीतम इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रीतम मंडलेचा आदी उपस्थित होते. मधुरा ओक यांनी सूत्रसंचालन केले.
स्वरनिनाद ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असून, पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘गंगाधर स्वरोत्सवा’चे आयोजन केले जाते, असे स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ यांनी सांगितले.