फरीदाबाद -लक्षात घ्या देशाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी किंमत चुकवावी लागेल,देशाची तिजोरी भरावी लागेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. विकास साधायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे साधन आहे ते म्हणजे पैसा हा पैसा प्रामाणिकपणे खर्च झाला तर विकास निश्चित होणार आहे.फरीदाबाद येथील ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ कस्टम्स अँड नार्कोटिक्स’ च्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात अरूण जेटली यांनी ही प्रतिक्रिया दिली.
महसूल म्हणजे सरकारी व्यवस्थेची लाइफलाइन आहे. सरकारी तिजोरीत जेवढा महसूल जमा होईल तेवढी देशाच्या विकासाला गती येईल. या देशात एक काळ असा होता की आपल्या उत्पन्नावर लागणाऱ्या कराबाबत लोक चिंता करत नव्हते. आता कर भरण्यासाठी करदाते स्वतःहून पुढे येत आहेत. लोकांनी पुढाकार घेतल्यामुळेच आम्ही जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करून देशाच्या कररचनेत फेरबदल केले असेही जेटली यांनी स्पष्ट केले.
उत्पन्नावर कर लागत असूनही जे लोक कराचा भरणा करत नाहीत अशा लोकांना कराच्या कक्षेत आणण्यासाठी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जास्त जबाबदारीने काम केले पाहिजे. जे लोक कराच्या कक्षेत येत नाहीत त्यांच्यावर दबाव टाकण्याची गरज नाही असेही जेटलींनी म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. प्रत्यक्ष कर हा करदात्यांकडून घेतला जातो, जास्तीत जास्त करदात्यांनी पुढे आले पाहिजे. असेही जेटलींनी स्पष्ट केले.