पुणे- बाजाराव पेशव्यांच्या मस्तानी आणि काशीबाई यांच्या एकत्र पिंगा घालण्याचा वाद मध्यंतरी उदभवलेला आठवेल अशी ही बातमी आणि त्यासोबत चे फोटो आहेत आहे .. आता म्हाळसा आणि बानू एकत्र नाचत असलेले फोटो … प्रसिद्धीसाठी आले आहेत …. गेल्या १ मार्च ला याचे चित्रीकरण पुण्यात झाले असावे . … या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आणि फोटो पहा इथे ….
अवघ्या महाराष्ट्राचं अराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणा-या या मालिकेची सुरूवात दोन वर्षांपूर्वी झाली आणि या मालिकेने एक इतिहास रचला. आज केवळ महाराष्ट्राच नाही तर देशभरात आणि जगातही जिथे जिथे मराठी प्रेक्षकवर्ग आणि खंडोबांचा भक्तगण आहे तिथे तिथे ही मालिका पोहोचली आहे. मालिकेसोबतच यातील कलाकारांना म्हणजेच मल्हार देवाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाबाईंच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूबाईंच्या भूमिकेतील ईशा केसकर यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. श्री खंडेराय म्हणजे साक्षात शिवाचा अवतार म्हणूनच या महाशिवरात्रीच्या निमित्ताने जय मल्हार मालिकेतील कलाकारांच्या सोबतीने रंगणार आहे ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ हा शानदार सोहळा. येत्या रविवारी ६ मार्चला महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून हा सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
श्री खंडेरायांच्या चरित्रातील आणि मालिकेतील काही प्रसंगांवर आधारित यळकोट यळकोट जय मल्हार हा सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सादर होणारा हा सोहळा खंडेरायांच्या भक्तगणांसाठी मनोरंजनाची एक आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्यात जय मल्हार मालिकेतील सर्व कलाकारांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते खंडोबा, बानू आणि म्हाळसादेवींच्या मंचावरील प्रवेशावेळी सादर झालेलं समुहनृत्य. ‘अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी’ गाण्याच्या नादावर खंडोबा मंचावर आले आणि सर्वत्र यळकोट यळकोट जय मल्हारचा एकच जयघोष झाला. याशिवाय पालखीतून झालेले म्हाळसादेवींचे आगमन आणि ‘खंडेराया देव माझा मल्हारी’ म्हणत बानूने सादर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय कार्यक्रमात विशेष रंग भरले ते म्हाळसा आणि बानूच्या नृत्याच्या जुगलबंदीने. यासोबतच देवानंद माळी यांनी सादर केलेला खंडोबाचा पोवाडा, जेजुरीच्या कलावंतांनी सादर केलेलं जागर आणि गोंधळ, समुह नृत्यातील गणेश वंदना, नारदमुनींचं आख्यान, मालिकेत आजवर सादर झालेलल्या गाण्यांवरील नृत्यांसोबतच समूह तांडव नृत्य, गणोबा आणि रंगा या जोडगोळीची विनोदी प्रहसने आणि इतर अनेक आकर्षक गोष्टीही सादर झाल्या. यासोबतच लोकप्रिय गायिका नेहा राजपालने आणि ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी महाशिवरात्रीनिमित्त तयार केलेलं खंडेरायाचं एक विशेष गाणंही यात सादर केलं. याप्रसंगी मालिकेचे निर्माते तथा लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत मालिकेच्या निर्मितीमागच्या काही गोष्टीही सांगितल्या. यावेळी लोकप्रिय निवेदक आणि अभिनेता संकर्षण क-हाडे याने आपल्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात वेगळी रंगतही आणली.
भक्ती आणि मनोरंजनाचा अनोखा मिलाफ असलेला ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ हा सोहळा येत्या रविवारी सायंकाळी ६ मार्चला झी मराठीवरून प्रसारित होईल.