‘रसिकमोहिनी’ या संस्थेचे नवं नाटक ‘जन्मरहस्य’ चा प्रयोग येत्या शनिवारी, २० फेब्रुवारी रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार असून वेगळ्या धाटणीच्या विषयावरती आधारित असलेल्या या नाटकाचे रहस्य आपणास येत्या शनिवारीच उलगडेल. तरी या नाटकाला नाट्य रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी असे आवाहन ‘रसिकमोहिनी’ नाट्य संस्थेच्या सर्वेसर्वा व चित्रपट निर्माती – अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनी केले आहे.
आई – वडील – मुलगी यांच अनोखं नातं या नाटकात गुंफण्यात आले आहे. “ठिपके कितीही येवू देत आपल्या वाटयाला, रांगोळी कशी काढायची, हे आपण ठरवायचं असतं”. असे नाटकातील अनेक संवाद मनाला अन् अंतरमनाला हळुवार स्पर्श करून जातात. सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आंनद नाडकर्णी या नाटकाचे लेखक आहेत. तर नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा कुमार सोहोनी यांनी सांभाळली आहे.
या नाटकात अमिता खोपकर, भाग्यश्री देसाई, वसुधा देशपांडे, गुरुराज अवधानी, अजिंक्य दाते अशी दिग्गज कलाकाराची फळी असून या नाटकाच्या निर्मात्या ‘रसिकमोहिनी’ संस्थेच्या भाग्यश्री देसाई या आहेत. संगीतकार – अशोक पत्की, नेपथ्य – अजय पुजारे, सूत्रधार – देनू पेडणेकर, शेखर दाते हे आहेत.



