पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व पुण्याचे प्रभारी संजय राठोड यांची आज काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेस पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस उत्कर्ष रूपवते, हाजी साईदअली खान, सरचिटणीस व प्रवक्ता रमेश अय्यर, महिला अध्यक्षा सोनाली मारणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांना संबोधित करताना प्रभारी संजय राठोड म्हणाले की, ‘‘केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उध्दवस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठिण झाले आहे. या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आधुनिक भारताचे शिल्पकार पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनापासून दि. १४ ते दि. २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यभर जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. दि. १४ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ‘‘जनजागरण अभियाना’’ मध्ये जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. शहरातील सर्व वॉर्डामध्ये पदयात्रा काढून महागाई विरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. याच्या व्यतिरिक्त पुणे शहरातील सर्व वॉर्डामध्ये कोपरा सभा घेऊन केंद्रातील सरकारच्या चूकीच्या आर्थिक धोरणाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणार आहे.’’
या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करणार आहे. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यात प्रभारी व सहप्रभारी नेमले आहेत.

