शाळेस जाता मौज वाटे भारी! (लेखिका – पूर्णिमा नार्वेकर)

Date:


‘हॅलो सर, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत आलो आहोत…अजून १ तास तरी लागेल ‘मोज’ला पोहोचायला. आम्हाला शाळेचे लाईव्ह लोकेशन शेअर कराल का…?’ संपदाने फोन करून किशोर सरांना अपडेट दिले. फार दिवसांनी म्हणजे खरं तर वर्षभरानंतर आम्ही वाड्याला ‘मोज’ आणि ‘बालिवली’ शाळेतील मुलांना भेटायला जात होतो. तसं पाहिलं तर ऑक्टोबरमध्ये मास्क देण्यासाठी वाड्याला जाणं झालं होतं पण तेव्हा फक्त किशोर सरांनाच भेटता आलं होतं. कारण त्यावेळी शाळा सुरू झाल्या नव्हत्या आणि मुलांना गटा-गटाने बोलावून शिक्षण चालू होते. आता मात्र शाळेला भेट देता येणार होती ज्यामुळे आम्हीही खूप आनंदी होतो. वाड्यात शिरलो तरी शाळेचे लाईव्ह लोकेशन आले नव्हते. किशोर सर म्हणाले होते,  ‘मोबाईलचं नेटवर्क गंडलंय बहुदा. जमलं तर लोकेशन पाठवतो.’ बहुदा तसंच झालं असावं. वाट चुकल्यामुळे आम्ही रस्त्याने विचारत विचारातच पुढे जात होतो. पाहतो तर सर आम्हाला घ्यायला आले होते. मोज शाळेतील मुलं आमची आतुरतेने वाट बघत होती. या वेळच्या शाळा भेटीचं कारणही तसं खासच होतं.
माझी मैत्रीण डॉक्टर नीलम रेडकर व मित्र निल केळकर यांनी त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त १० वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. त्याचप्रमाणे डॉ. नीलम रेडकर यांनी मास्क आणि सॅनिटाइझरही  पुरवले. आमच्याकडे जमा असलेल्या देणगीतून वर्गासाठी सॅनिटाइझरच्या मोठ्या बाटल्या, प्लास्टिकचे पाऊच हे साहित्यही आम्ही घेतले. यावेळी आमच्या सोबत एक अतिथी पाहुणाही आला होता. राहुल साठम हा मुलांना मनोरंजनाचे खेळ शिकविणार होता.
मोज शाळेतील मुलं आमच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मुलांनी आम्हाला देण्यासाठी शाळेजवळील फुलझाडांपासून पुष्पगुच्छ बनविले होते. शिक्षकांनी त्या पुष्पगुच्छांनी आमचे स्वागत केले. आम्ही आणलेल्या शैक्षणिक वस्तू आणि सुरक्षिततेचे साहित्य ( मास्क आणि सॅनिटाइझर) यांचे वाटप केले. मंजिरी करमरकर, छायनिका अय्यर आणि संपदाने शाळेच्या वाचनालयासाठी गोष्टींची पुस्तके भेट म्हणून दिली, ती आम्ही मुलांसाठी आणली होती. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. ओमकार दादाला पाहून तर मुलांनी त्याच्या भोवती गराडाच घातला आणि त्याला आपल्याकडील फुलं देऊ केली; त्याच्याशी गप्पा मारण्यात दंग झाले. ओमकारने राहुलची ओळख करून दिली आणि ‘हा दादा आता मनोरंजनाचे खेळ घेणार आहे’ असे सांगितल्यावर मुलं जाम खुश झाली. राहुलने सूत्रं हातात घेतली आणि खेळ सुरू केले. आधी वर्गात काही खेळ घेतले आणि मग शाळेच्या पटांगणात. सुरुवातीला थोडी बावरलेली मुलं आता राहुलबरोबर खेळ खेळण्यात मस्त रमून गेली होती. त्यांच्या बरोबर हेलेना, संपदा आणि ओमकारनेही खेळात भाग घेतला. काही वेळाने शाळेतील शिक्षकही त्यात सहभागी झाले. खूप महिन्यांनी सुरू झालेल्या शाळेचे पटांगण आज पुन्हा मुलांच्या खेळण्याने फुलले होते. राहुलने या मनोरंजनाच्या खेळातून मुलांना सामाजिक शिक्षणाचे धडे दिले. मुलं खेळात इतकी समरसून गेली की शाळा कधीची सुटली आहे आणि आता घरी जायला हवं, हेही विसरून गेली होती.
किशोर सर आम्हाला सांगायला आले की प्रल्हाद सरांनी फोनवरून निरोप दिलाय…आता आपल्याला बालिवलीच्या शाळेत जायला हवं. आम्हीही मग खेळ आटोपता घेऊन मुलांचा निरोप घेतला. खरं तर शनिवार असल्याने बालिवलीची शाळा कधीच सुटली होती पण तरीही मुलं आमची वाट पाहत थांबली होती. तिथे थांबलेल्या प्रल्हाद सरांनी आणि मुलांनी आमचे स्वागत केले. या शाळेतही शैक्षणिक वस्तू व सुरक्षिततेचे साहित्य ( मास्क आणि सॅनिटाइझर )   यांचे वाटप केले गेले. मुलांशी छान गप्पा मारल्या. मुलंही विचारलेल्या प्रश्नांना उत्स्फूर्तपणे उत्तरं देत होती. ‘करोनामुळे शाळा बंद होती तेव्हा काय केलं’ असं विचारल्यावर मुलांनी सांगितलं की खूप कंटाळा आला. आम्हाला खरं तर शाळेत यायला जास्त आवडतं. मुलांना शाळेची ओढ असणं हाच शिक्षकांसाठी खूप मोठा पुरस्कार आहे. किशोर सर, प्रल्हाद सर आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेत असलेली मेहनत दिसून येते आणि याची दखलही घेतली गेली आहे. नुकताच प्रल्हाद सरांना ‘जायंटस ग्रुप ऑफ वाडा वैतरणा’ या संस्थेकडून ‘शिक्षणरत्न’ पुरस्कार मिळाला आहे.
प्रल्हाद सरांनी शाळा सुटल्याचे जाहीर केले आणि मुलांना घरी पाठवले. लॉकडाऊन काळातील मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाविषयी प्रल्हाद सरांशी बोलताना बरीच माहिती मिळाली. महाराष्ट्रच नाही तर अगदी तामिळनाडू, केरळपर्यंत ऑनलाईन शिक्षणाचा झालेला परिणाम, येत असलेल्या अडचणी, शैक्षणिक धोरण या सर्वांवर प्रल्हाद सर आणि किशोर सर चर्चा करत होते. दुपारचे २ वाजून गेले होते. काही मुलं अजूनही शाळेतच खिडकीपाशी रेंगाळत होती. त्यातल्या २ मुलांनी आमच्यासाठी खाऊ म्हणून बोरं आणून दिली. उशीर झाला होता, आम्हालाही निघायचे होते. प्रल्हाद सर म्हणाले की शाळेला कुलूप लावेपर्यंत ही मुलं काही जायची नाहीत. रोजच असं होतं, मुलांना घरीच जायचं नसतं. मग शाळा सुटल्यावर मला जबरदस्तीने पिटाळावं लागतं. अभ्यासाची गोडी लावणारे जर शिक्षक असतील तर मुलांना शाळेत यायला मनापासून आवडतं, हे वाड्यातील शाळांतून प्रत्ययास येतं. प्रल्हाद सरांनी वर्गांना कुलूप लावले आणि शाळा सुटली आहे, आता घरी जा असे मुलांना सांगितले. आम्हीही सरांसोबत बाहेर पडलो आणि मुंबईची वाट धरली.

 पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...