‘इसाक बागवान’ नावाची ‘शौर्य’गाथा पुस्तकरुपात
मुंबई-
मुंबईच्या पोलीसदलाचे नाव स्कॉटलँड पोलीसदलाच्या बरोबरीने घेतले जावे अशी कर्तबगारी
करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे निवृत्त पोलीस सहाय्यक
आयुक्त इसाक बागवान. त्यांची पोलीसी कारकिर्दीतील ‘शौर्य’गाथा ‘इसाक बागवान’ पुस्तकरूपात
प्रकाशित होत आहे.
मुंबईतला १९७६ ते २००९ हा काळ म्हणजे गुन्हेगारीने गाजलेला काळ. त्यात बागवान यांनी
बजावलेल्या कामगिरी मुळे राष्ट्रपती शौर्यपदकाचे ते तीन वेळा मानकरी ठरले. आपल्या ३५ वर्षांच्या
पोलीसी कारकिर्दीत अनेक केसेस त्यांनी हाताळल्या. त्यापैकी ‘महाराष्ट्राच्या पोलीस इतिहासात
प्रथमच झालेले एन्काऊंटर – कुख्यात गुंड मन्या सुर्वेचे एन्काऊंटर’, ‘सत्र न्यायालयात साबीर मर्डर
केसेसच्या सुनावणीत आरोपी डेव्हिड परदेशी जायबंदी’, ‘२६/११ चा अतिरेकी हल्ला – नरिमन
हाऊस’ यांसारख्या अनेक केसेसपैकी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्याच नाहीतर, भारताच्या पोलीस
इतिहासात महत्त्वाच्या ठरलेल्या निवडक चित्तथरारक घटनांचे सत्यकथन त्यांनी ‘इसाक बागवान’ या
पुस्तकात केले आहे.
आपले अनुभव प्रत्यक्ष ऐकून घेऊन एका हिंदी चित्रपटात चुकीच्या पद्धतीने मांडणी केली
असल्याचे लक्षात आल्यावर चोख सत्य लेखी नमूद करण्याची आवश्यकता इसाक बागवान यांना
भासली, हे ‘इसाक बागवान’ या पुस्तकाचे प्रयोजन.
‘गुन्हेगारी जगताचा एनसायक्लोपेडीया वाटावा असे हे पुस्तक पोलीसदलाला एका विशिष्ट
उंचीवर नेऊन ठेवणारे आहे’, असे श्री. विश्वास नांगरे-पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद
रेंज) यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे.
या पुस्तकात केवळ शौर्यगाथाच नाहीत तर, कुठलीही केस सोडवताना ‘खबरी’चे साहाय्य
किती मोलाचे असते हे देखील बागवान यांनी अधोरेखित केले आहे. आपल्या आदर्श वरिष्ठ गुरूजनांप्रत
आदराची आणि कृतज्ञतेची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. या पुस्तकाचे शब्दांकन अजय ताम्हणे
यांनी केलेले असून ‘एव्हरशाईन पब्लिकेशन’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.