पुणे- १९८७ साली आखणी केलेल्या वर्तुळाकार मार्गाचा खर्च अजून १० पटीने वाढण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा सवाल करत या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार रस्त्याची (एच.सी.एम.टी.आर.) फेर निविदा तातडीने काढण्यात यावी अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
१९८७ च्या विकास आराखडयामध्ये एच.सी.एम.टी.आर रस्त्याची आखणी करण्यात आली होती.सदर रस्ता करणेबाबत अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत असून अनेक लेखी पत्रे दिलेली आहेत.शहरातील वाहतूक समस्येमुळे अपघाताचे व मृत्युचे प्रमाण वाढत असून मृत पावलेल्या कुटुंबियांचे अतोनात नुकसान होत आहे. वाहतूकीचा समस्या सोडविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. सदर प्रकरणी मुख्य सभेपुढे देखील लेखी प्रश्न दिलेले आहेत. एच.सी.एम.टी.आर रस्ता शहराच्या वाहतूकीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा असून यामध्ये बीआरटी मार्ग देखील आहेत. तसेच एच.सी.एम.टी.आर रस्त्याची जे.एम. झाली असून कन्सलटंट देखील नेमण्यात आला आहे. एच.सी.एम.टी.आर रस्ता करणेसाठी बहुतांशी जागेचे भूसंपादन देखील झालेले आहे.
शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या याप्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागून निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली होती. ही निविदा जादा दराने आल्याने रदद करण्यात आली. या प्रकल्पाचे पैसे टप्याटप्याने देण्यात येणार असून ३ वर्षात रस्ता करण्यात येणार होता. सदर प्रकल्प तातडीने मार्गी लागणे आवश्यक असून या प्रकल्पाचा सदयस्थितीतील खर्च दहा पटीने वाढल्यावर प्रशासन निविदा प्रक्रिया राबविणार का ? असा प्रश्न उभा आहे. शहरात दैनंदिन अपघाताची संख्या वाढत असून मृत्युचे प्रमाण वाढत आहे.
शहरातील अत्यंत महत्वाचा एच.सी.एम.टी.आर.योजनेबाबत महापालिका आयुक्त यांचे दालनात बैठक झाली असून योवळी आबा बागूल यांनी विचारणा केली असता आयुक्तांना प्रशासनाकडून एच.सी.एम.टी.आर योजनेची सर्व माहिती देणेबाबत ठरले होते. परंतु प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. वास्तविक सदर प्रकल्पासाठी मुख्य सभा व स्थायी समिती यांची मान्यता झाली आहे, निविदा मागविली आहे, असे असताना प्रशासन उदासीन असल्याने शहरात वाहतूक समस्या उदभवून प्रदूषणात वाढ होत आहे. एकदा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर त्याची फेरनिविदा मागविणे क्रमप्राप्त ठरते. सदर निविदा प्रक्रिया अद्याप रद्द झालेली नाही.
सदर महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेणेसाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असून एच.सी.एम.टी.आर रस्ता करणेसाठी प्रशासनाने राबविलेल्या निविदेची फेरनिविदा तातडीने काढावी अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.

