पुणे : शिवसेनेच्या शिंदे गटाने आता पुण्यातून जोरदार बांधणी करण्यासाठी हालचालींना प्रारंभ केल्याचे समजते आहे या दृष्टीने हडपसर चे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांना या गटाकडून ठाण्यात भेटीचे आमंत्रण देण्यात आल्याचे वृत्त आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पुण्यात अद्याप शिंदे गटाला उघड-उघड कोणीही पाठिंबा दिलेला नव्हता. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ज्येष्ठ नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा गट जाणार आह.या गटाला थेट विधान परिषदेवर आमदार पदाची संधी अथवा राज्यातील महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी काही माजी नगरसेवक मुंबईत ठिय्या मांडून आहेत. उद्या ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी या नगरसेवकांना चर्चेसाठी बोलविले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट शिवसेनेला धक्का देण्यासाठी जुळवाजुळव करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे एकीकडे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे आज सकाळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलविलेल्या बैठकीस पहिल्या रांगेत उपस्थित असताना नाना भानगिरे मात्र शिंदे गटाकडे जात असल्याचे वृत्त आहे. पश्चिम पुण्यातूनही भानगिरे यांना बळ मिळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
पुण्यातील बहुतांशी आजी-माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याची शिंदेंची व्यूहरूचना दिसत आहे.भानगिरे यांच्यासह पुणे महापालिकेत शिवसेनेचे दहा नगरसेवक होते. त्यात भानगिरे तिसऱ्यांना नगरसेवक झाले होते. याच पंधरा वर्षांच्या काळात त्यांनी दोनदा विधानसभेच्या निवडणुका लढल्या आहेत. जुन्या नगरविकास खाते असल्यापासून शिंदे आणि भानगिरे यांच्यात जवळीक होती. पुण्यातील विविध प्रकल्पांसाठीचे प्रस्ताव मांडून ते शिंदेंकडून लगेच मंजूर करून घेत, भानगिरेंनी आपली चुणूक दाखवून दिली होती. तेव्हापासून शिंदे-भानगिरे यांच्यात मैत्रीही होती. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या चारच दिवसांत त्यांची भेट घेऊन भानगिरे यांनी नव्या राजकीय वाटचालीचे संकेत दिले.गेल्या अडीच वर्षात शिंदे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळे कार्यक्रम, विकासकामांच्या माध्यमातून ताकद देण्याचे काम केलेले आहे.भानगिरे यांचा जनसंपर्क या भागात दांडगा असल्याने त्याचा फायदा शिंदे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघ, हडपसर तसेच पुरंदर मतदारसंघासाठी होणार आहे. विशेष म्हणजे पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही शिवसेनेशी दोनच दिवसांपूर्वी फारकत घेत शिंदे गटाला उघडपणे जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदे गट आता पुणे शहर तसेच जिल्ह्यात ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट दिसते.
भानगिरे यांनी त्यांच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात “एकनाथ शिंदे’ या नावाने उद्यान उभारले आहे. राज्यातील राजकीय घडामोडीच्या काळात ते शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यामुळे मुख्यमंत्र्याबरोबर असलेल्या या जुन्या ऋणानुबंधामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकतो, अशी चर्चा शहरात आहे. तसे झाल्यास त्याचा थेट फायदा आगामी महापालिका निवडणुकीत आणि त्यापुढे शिरूर लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला आणि त्यांच्या समर्थकांना होऊ शकतो. भानगिरे यांच्यावर शहर तसेच एखादे प्रमुख महामंडळही दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे

