मुंबई, दि. ८ नोव्हेंबर – मंत्री अस्लम शेख आणि काशीफ खान यांच्या संदर्भातील भूमिका तपासण्याची आवश्यकता आहे. फोटोच्याबाबतीत त्यांनी काही नाकारलेले नाही. त्यामुळे अस्लम शेख यांच्याबरोबर काशीफ खानचे फोटो प्रासंगिक आहेत की त्यांचे आधीपासूनचे संबंध आहेत याची माहिती तपास यंत्रणांना घ्यावी लागेल. त्यांनाच तशी निमंत्रणे का येतात? इतर मंत्र्यांना काय येत नाहीत, याचाही विचार करावा लागेल असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रूझ ड्रग प्रकरणातील संशयित काशीफ खान याने त्यांना क्रूझ ड्रग पार्टीचे पाठवलेले निमंत्रण खुलासा केला. यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली, तेव्हा ते बोलत होते. मंत्री अस्लम शेख यांच्या स्पष्टीकरणातूनच वस्तुस्थिती समजून येते. त्यांनी सांगितले की, अशी लोकं येतात, आम्ही फोटो काढत असतो. परंतु भाजपच्या नेत्यांबरोबरच्या फोटो काढले तर तिथे प्लॅनिंग केले, अशी विरोधकांची भूमिका असते अशी टिकाही त्यांनी केली.
नवाब मलिक यांच्याकडचे मटेरियल संपले
क्रूझ ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी आज केलेल्या आरोपावर बोलताना दरेकर म्हणाले की,नवाब मलिक यांच्याकडचे मटेरियल आता संपलेले आहे. त्यामुळे आर्यन खान प्रकरणावरून त्यांनी आपला मोर्चा आता मोहित कंबोजकडे वळविला आहे. तसेच विनाकारण नोटबंदीचा विषय उपस्थित करीत आहेत आपण काहीतरी वेगळे करतोय व गोपनीय माहिती काढतोय, असे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. आता त्यांच्या सासरची, माहेरची सर्व जंत्रीच त्यांनी काढावी. अशा प्रकारचे राजकारण करुन व्यक्तिगतस्तरावर इतरांची अवहेलना करणे कधीच झाले नव्हते. त्याच्या आरोपात काही आधार नाही, तथ्य नाही. जर असेल तर त्याची माहिती त्यांनी तपास यंत्रणांना द्यावी. पण त्यांच्या नातेवाईकांना व महिलांना अशा पद्धतीने टार्गेट करणे यातून मलिक यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम केले आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली.
नवाब मलिक यांना ती भाषा शोभत नाही
नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली असून नोटबंदी असफल झाली, मोदींना कुठली शिक्षा करायची, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे यावर बोलताना दरेकर म्हणाले की, नवाब मलिक यांची मोदी यांना शिक्षा देण्याची भाषा करण्याची औकात नाही. आज देशातील जनतेमध्ये मोदी साहेबांविषयी आदराची भावना आहे. मोदी साहेबांची प्रशंसा देशात नव्हे जगात होते. नवाब मलिक यांच्या नोटा आजही शिल्लक असाव्यात. त्यामुळे त्यांची विल्हेवाट कुठे लावायची, असा नवाब मलिक यांना प्रश्न पडला असेल. आपण पाहतोय नोटाबंदीमुळे करोडोंचा पैसा चलनाबाहेर होता तो टॅक्सखाली येत नव्हता. तो व्यवहारात आला. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. ते पैसे चलनात आले. नवाब मलिक यांच्या पोटात दुखण्याचे काही कारण नाही. आज डीबीटी आले. थेट व्यवहाराने अकाउंटमध्ये पैसे आले. आदिवासी असतील, शेतकरी असतील, महिला असतील, गरीब असतील यांना डायरेक्ट मदत मिळू लागली. हे जर कॅशने असते तर मध्ये दलालच होते. राजीव गांधीदेखील यांनी सांगितले होते की, एक रुपया जर मदत असली तर पंधरा रुपये खाली पोहोचतात मग ६५ रुपये दलालांना जातात. ही दलालांची पोटदुखी आहे. अशा प्रकारची अवस्था नवाब मलिक यांची झाली असावी म्हणून संबंध नसताना नोटाबंदी विषयावर त्यांनी विनाकारण प्रतिक्रिया दिली, असा टोलाही प्रविण दरेकर यांनी मारला.

