पुणेः- मुलाखत हे एक शास्त्र असले तरी ते त्याच पद्धतीने पुढे गेले पाहिजे, असा नियम नसतो. प्रश्नामागून प्रश्न आणि उत्तरामागून उत्तर म्हणजे मुलाखत नव्हे. मुलाखत कर्त्याने समोरच्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करून मुलाखतीतील उत्स्फूर्तता टिकवून ठेवणे, हे त्याचे कौशल्य असते, असे मत ज्येष्ठ मुलाखतकार, निवेदक अरूण नूलकर यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ निवेदक अरुण नूलकर यांच्या पंचात्तरीनिमित्त संवाद पुणे तर्फे एस.एम.जोशी सभागृहात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते नूलकर यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी.डी.पाटील होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालिका निकिता मोघे, महाराष्ट्र कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आणि संवाद पुणेचे सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निलीमा अरूण नूलकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी घेतलेली ज्येष्ठ निवेदक अरुण नूलकर यांची मुलाखत. दोन दिग्गजांच्या या मनमोकळ्या संवादातून उपस्थित रसिकांना मुलाखत, निवेदन आणि सूत्रसंचालन करणा-या अरूण नूलकरांच्या रूपात विविध पैलूंनी संपन्न अशा व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले.
यावेळी दिलीप प्रभावळकर यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देतांना नूलकर म्हणाले की, आपण मुलाखतकर्त्यांला सामवून घेतो, त्याच तोडीस तोडी श्रोत्यांना देखील आपल्या मुलाखतीत सामावून घेणे आवश्यक असते. मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि मुलाखत ऐकणारा हा त्रिस्तरीय संवाद असतो. तुम्ही मुलाखतकर्त्याशी एकरूप झाल्याशिवाय मुलाखत खुलत नाही. कोणत्याही मुलाखतीच्या आधी पूर्व अभ्यास आवश्यक असतो आणि मी तो अभ्यास केल्याशिवाय व्यासपीठावर जात नाही. मी तबलावादक आहे म्हणून संगीत क्षेत्राशी माझा जवळचा संबंध असल्याने सांगितीक कार्यक्रमांचे निवेदन, सूत्रसंचालन हे कार्यक्रम माझ्याकडे अधिक आले. श्रीधर फडके यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा निवेदनाचा प्रवास सुरू झाला. बी.एम.सी.सी. मध्ये वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत असतांना इथे माझा सांस्कृतिक पाया रचला गेला. या सगळ्या प्रवासात बीएमसीसीचे प्रार्चार्य, प्राध्यापक आणि व्यवस्थापन यांनी मला खूप सहकार्य केले. मी व्यवसायाने प्राध्यापक असलो तरी माझ्या निवेदनात मी प्राध्यापकी थाट येऊ दिला नाही.
यावेळी नूलकर यांनी वेगवेगळ्या दौ-यांच्या निमित्ताने घडलेले किस्से देखील सांगितले. ते म्हणाले की, अनेकदा एखाद्याची प्रथमच मुलाखत घेत असतांना दोन पैलवान कुस्ती खेळण्याआधी अंगावर जशी माती टाकतात तसाच अंदाज घेत घेत मुलाखत पुढे सरकते. बोलक्या व्यक्तीला थांबवणे आणि अबोल व्यक्तीला बोलके करणे अशा अनेक आव्हानात्मक परिस्थितींचे किस्से मजेदार शैलीत नूलकर यांनी सांगितले.
यावेळी गायक-संगीतकार सलील कुलकर्णी म्हणाले की, नूलकरांचे सूत्रसंचालन म्हणजे केवळ सूत्रसंचालन नसते तर ते निरूपण आणि निवेदन असते. मुलाखतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी केलेल्या नूलकरांनी त्यांच्या अनुभवांचे दस्ताऐवजीकरण करावे, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ.पी.डी. पाटील म्हणाले की, नूलकरांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या किश्श्यांचे एक पुस्तक लिहावे. तसेच निवेदनाचा एक जाहीर कार्यक्रम घेऊन भावी पिढीला मार्गदर्शन करावे.
यावेळी बोलतांना अरूण नूलकर यांच्या कन्या मंजुश्री नूलकर म्हणाल्या की, बाबा खूप शिस्तबद्ध आहेतत्यांनी लहानपणापासून आम्हाला खूप पुस्तके वाचायला दिली. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होऊन त्याची सवय लागली. आज महाराष्ट्रात, देशात, परदेशात असे कुठेही वावरतांना, तू नूलकरांची मुलगी आहे का, असा अभिमानास्पद प्रश्न कौतुकाने विचारला जातो, तेव्हा खूप छान वाटते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. सुत्रसंचालन सवाई गंधर्वचे गेली अनेक वर्षे समर्थपणे सूत्रसंचलन करणारे आनंद देशमूुख यांनी केले. सचिन ईटकर यांनी आभार मानले.

