एमआयटी डब्ल्यूपीयूत पहिल्या आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषदेचा समारोप
पुणे:“आतंकवाद्यांच्या व्याख्येचे स्पष्टीकरण देता येऊ शकत नाही. सध्या प्रॉक्सीवॉर सुरू आहे. देशातील २६ नोव्हेंबर ची घटना ही याचे उदाहरण आहे. हा हल्ला भारता विरूध्द पुकारलेले एक छुपे युद्धच होते. कायदयांच्या आड लपून जे सूत्रधार हल्ले करीत आहेत त्यांसाठी अंतरराष्ट्रीय कायद्यात बदल करणे गरजेचे आहे.”असे विचार ज्येष्ठ कायदे तज्ञ व सरकारी वकील पद्मश्री डॉ.उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे भारत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘अंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषदे’च्या ऑनलाइन समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी राज्य सभेचे खासदार सुजीत कुमार, यूएन इंटरनॅशनल लॉ कमिशनचे सदस्य डॉ. अनिरुद्ध राजपूत, सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती ज्ञान सुधा मिश्रा, पद्मश्री अॅड.प्रविण पारीख व सुप्रीम कोर्टाचे वकील डॉ. ललित भसीन हे सन्माननीय पाहुणे म्हणून होते.अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, लिबरल ऑर्ट विभागाच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.अनुराधा पराशर आणि स्कूल ऑफ लॉ च्या प्रमुख डॉ. पोर्णिमा इनामदार उपस्थित होते.
पद्मश्री अॅड. उज्वल निकम म्हणाले,“ मुुबईवरील हल्ला हा भारता विरूध्द पुकारलेले युद्ध आहे हे न्यायालयात सिद्ध करण्यास ब्रिटिशकालीन कायदयामुळे अडचणी आल्यात. शांती भंग करणार्या या घटनेत कित्येक मारले गेले. घटनेचे धागे दोरे हे कराची येथे सापडले. त्या घटनेत जीवंत सापडलेला कसाब यावर केस चालली. त्याने संपूर्ण देश ढवळून निघाला. कायद्याच्या माध्यमातून खरच शांती स्थापन केली जाऊ शकते का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जगात आतंकवाद थांबवू शकणार नाही, परंतू कायदयाच्या माध्यमातून शांतीसाठी कार्य केले जाऊ शकते. एकंदरीतच समाज कल्याणासाठी शांती ही गरजेची आहे.”
सुजीत कुमार म्हणाले,“न्यायव्यवस्थेमधील जागतिक स्तरावरील तुलनात्मक अभ्यास करता असे दिसून येते, की देशात न्यायमूर्तींची संख्य खूपच कमी आहे. कदाचित त्या कारणांमुळेच कोर्टात करोडो केसेस पेंडिंग पडून आहेत. यातील ७७ टक्के केसेस वर्षाभरापासून पडलेल्या आहेत, जे देशासाठी चिंतेची बाब आहे.आज संसदेमध्ये न्यायसंस्था, प्रशासन आणि शासन यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना दिसते. एमआयटीने आयोजित केलेली ही परिषद देशासाठी खूप महत्वाची आहे.”
डॉ. अनिरुद्ध राजपूत म्हणाले,“आंतरिक शांती असल्या शिवाय बाह्या शांती निर्माण होऊच शकत नाही. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानात वाढणारे एमआयटी विद्यापीठ जगात शांती निर्माण करण्यासाठी जे कार्य करीत आहे ते अप्रतिम आहे. आज कायद्याच्या माध्यमातून शांती निर्माण होईल का हा एक मुद्दा आहे. आधुनिक आंतरराष्ट्रीय कायदांच्या विचार केला तर ते आपल्या येथील समाजानुसार नसेल. विदेशी संस्कृती ही वेगळी आहे. तसेच कौटिल्य यांनी आध्यात्मिक पद्धतीने लिहिलेले ज्ञान अप्रतिम आहे. त्यांवर नव्याने विचार व्हावा. आजच्या युवकांनी सर्वात प्रथम एक विदेशी व इंग्रजी भाषा शिकावी.”
पद्मश्री अॅड.प्रविण पारीख म्हणाले,“समाजिक सुरक्षेसाठी कायदे व नियम महत्वाचे आहे. जागतिक शांतता निर्मितीसाठी राज्यघटनेत काही गोष्टींची नोंद करुन ठेवली आहे. एमआयटी ने आयोजित केलेली ही परिषद शांतीसाठी महत्वपूर्ण असेल.”
ज्ञान सुधा मिश्रा म्हणाल्या,“समाजाला शिस्त लागण्यासाठी कायदा आणि नियम गरजेचे आहे. कायद्यांच्या माध्यमातून समाज आणि सरकार यांच्यात उत्तम प्रकारचा ताळमेळ बसतो. तसेच मानवी जीवनामध्ये शांती किती महत्वाची आहे हे कळण्यासाठी वाईट घटनाना आळा घालण्याचे कार्य कायद्याच्या माध्यमातून होते. कायद्याचे उल्लंघन केल्यास कोर्टाच्या माध्यमातून त्याला आळा घालण्याबरोबरच शिक्षा दिली जाते.”
डॉ. ललीत भसीन म्हणाले,“जगात शांती संस्कृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी कायद्याची भूमिका या विषयावर आयोजित पहिल्या परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या वकिलांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. याचा लाभ विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच होईल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“जागतिक स्तरावर शांती निर्माण करण्याची जवाबदारी ही सर्वांची आहे. जगात चाललेली शर्यत ही मानवजातीसाठी घातक आहे. मन शांती आणि आत्मशांतीच्या माध्यमातून समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकेल. त्यासाठी वैश्विक कायद्याचे पालन केल्यास जगामध्ये शांती नांदेल.”
राहुल विश्वनाथ कराड यांनी या परिषदेमागची भूमिका स्पष्ट करून समाजात शांतता नांदण्यासाठी जे काही करता येईल त्यावर विचार मांडले.
डॉ.आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.डॉ. अनुराधा पराशर यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व डॉ. पोर्णिमा इनामदार यांनी आभार मानले.

