पुणे : कलेची जाण असलेल्या पुणेकरांसाठी पुढील तीनही शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे पर्वणी ठरणार आहे. निमित्त आहे पुण्यातील ‘ड्रीम अ पेंटिंग’ या संस्थेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सुप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनीचे. येत्या १८, १९, २० नोव्हेंबर, २५, २६, २७ नोव्हेंबर आणि २, ३ आणि ४ डिसेंबर दरम्यान मॉडेल कॉलनी येथील रवी परांजपे आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ८ दरम्यान होणा-या ही प्रदर्शनी होणार असून ती सर्वांसाठी विनामूल्य व खुली असणार आहे.
या प्रदर्शनीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पुढील तीन आठवडे रेमब्रांट, व्हेरमीर आणि कॉन्स्टेबल या जगप्रसिद्ध कलाकारांच्या प्रसिद्ध कलाकृतींचा समावेश असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात डच कलाकार रेमब्रांट यांची पुण्यतिथी जगभरात साजरी केली जाते. त्या निमित्ताने या प्रदर्शनीच्या माध्यमातून रेमब्रांट यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यांच्या कलाकृतींची माहिती पुणेकरांना व्हावी यासाठी त्यांच्यावरील माहितीपटही यावेळी दाखविण्यात येणार आहे. याबरोबरच या प्रदर्शनीमध्ये ज्येष्ठ कलाकार रवी परांजपे हे रेमब्रांट, व्हेरमीर आणि कॉन्स्टेबल या कलाकारांबद्दल, त्यांच्या कलाकृतीं उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
या प्रदर्शनीच्या पहिल्या आठवड्यात दि. १८ व १९, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ८ या वेळेत चित्रप्रदर्शन तर दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत रवी परांजपे रेमब्रांट यांच्या कलाकृतीवर उपस्थितांशी संवाद साधतील. यावेळी अॅमस्टरडॅम येथील रेमब्रांट संग्रहालय यांच्या वतीने प्रदर्शित करण्यात येणा-या माहितीपटाचा आस्वाद उपस्थितांना घेता येईल. दुस-या आठवड्यात दि. २५ व २६, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ८ या वेळेत चित्रप्रदर्शन तर दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ तर ७ या वेळेत बीबीसीने व्हेरमीर यांच्या ‘द आर्ट ऑफ पेंटिंग’ या कलाकृतीवर तयार केलेला माहितीपट दाखविण्यात येईल. तर तिस-या आठवड्यात दि. २, ३ व ४ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत चित्रप्रदर्शन व कॉन्स्टेबल यांच्यावर बीबीसीने केलेला माहितीपट दाखविण्यात येईल.
प्रदर्शनी सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य असून dreamapainting@gmail.com या मेल आयडीवर आगावू नोंदणी करता येणार आहे. याशिवाय ९८९००४५४८५ / ९७६७५८६५९८ या क्रमांकांवरही नोंदणी करता येईल. स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधाही कलाप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.