हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सात दिवसात सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन :
पुणे-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सात दिवसात सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज खासदार गिरीश बापट यानी दिला आहे .
पुणे, दि.8 ( प्रतिनिधी )
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम सात दिवसात चालू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार गिरीश बापट यांनी सोमवारी पीएमआरडीए प्रशासनाला दिला. पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुहास दिवसे यांची बापट यांनी भेट घेतली. व मेट्रोच्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.त्यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनिता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नीलिमा खाडे, स्वप्नाली सायकर, कोथरूड भाजपा मंडल अध्यक्ष पुनीत जोशी उपस्थित होते.
बापट म्हणाले की हिंजवडी येथील आयटी पार्क, पुणे व पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर प्रस्तावित मेट्रो मार्गाचे काम गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होणे शक्य नाही. आपल्याकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. सदर मेट्रो नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास भविष्यकाळात त्यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल ही शक्यता नाकारता येत नाही. याचा नकळत आर्थिक भार हा पुणेकर जनतेला व शासनाला सोसावा लागणार आहे, ही बाब नक्कीच गंभीर आहे. सदर मार्ग सुरु होण्यास विलंब होत असल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा झालेला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.
सदरचा मार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड मधील नागरिक व आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका देणारा असल्यामुळे सदर मार्गाचे काम ज्या ९८ % जागा ताब्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी तातडीने सुरू करावे, तसेच ज्या उर्वरित शासनाच्या जागा ताब्यात आलेल्या नाही, त्या तातडीने ताब्यात घेणेबाबत प्रशासनाने लक्ष देवुन कार्यवाही करावी. जेणे करुन सदरचा प्रस्तावित मेट्रो मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.आठ दिवसात काम सुरु न झाल्यास नजीकच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला आंदोलन करावे लागेल. चर्चेच्या शेवटी २ /३ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन सुहास दिवसे यांनी दिले.

