एमआयटी डब्ल्यूपीयूत सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाचा समारोप
पुणे, दि, १६ ऑगस्टः“ देशाला प्रगतीपथावर नेतांना धर्म आणि भावनात्मक गोष्टी बंद करून सरकारला नवी कार्य दिशा ठरवावी लागणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, रस्त्ये आणि पाणी या गोष्टी प्रगत होणार नाही तो पर्यंत हा देश पुढे जाऊ शकत नाही. ज्या देशात २३ टक्के लोकांजवळ घर नाही तेव्हा घर घर तिरंगा हा नाराच चुकीचा आहे.”असे विचार राज्य सरकारच्या महात्मा फुले ग्रंथ प्रतिष्ठान समितीचे सदस्य सचिव व लेखक प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी, पुणेतर्फे कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
थेरोकेयरचे संस्थापक डॉ.ए.वेलूमणी, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, आणि आरटीआय कार्यकर्ता विवेक वेलणकर हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रो.डॉ विश्वनाथ दा कराड होते.
यावेळी प्रगतीशील शेतकरी श्री. काशीराम दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ सस्टेनेबल स्टडिजच्या संचालिका प्रा.अनामिका बिश्वास उपस्थित होते.
प्रा. हरी नरके म्हणाले,“ कोविडच्या काळानंतर सरकारने आरोग्य क्षेत्रावर कोणताही खर्च केलेला नाही. देशाची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सरकारला कठोर पाऊले लागतील. एका सर्वेनुसार येणार्या काळात आर्टीफिशल इंटिलिजेंटमुळे ६५ टक्के रोजगार कमी होणार आहे. अशावेळेस सरकारने काय नियोजन केले आहे. विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करतांना आम्हाला शेती संदर्भात योग्य नियोजन करावे लागेल. आझादी का अमृत महोत्सव साजरा करतांना या देशात पाण्यासाठी युवकाला मृत्यूच्या दारात जावे लागते. येथे प्रत्येक वर्गातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक हे द्रारिद्र्य रेषे खालील आहेत. शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात खूप मागे असल्याची खंत आहे.”
डॉ वेलूमणी म्हणाले,“ ज्ञान, दिशा आणि ऊर्जा या त्रिसुत्रीच्या आधारेच युवकांची प्रगती होईल. जीवनात आनंद हे सर्वात महत्वाचा असून सतत काम करत रहा. रोजगाराच्या मागे धावण्याऐवजी रोजगार निर्मिती करण्यावर अधिक भर दयावा. नेतृत्व गुण हा अत्यंत महत्वाचा असून त्याआधारेच भारत भविष्यात संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल.“कोणताही व्यवसाय करतांना रिस्क महत्वाची आहे परंतू त्याआधी आपल्या कुटुंबाची सुरक्षा घ्यावी. कधीही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करत रहा. ”
विवेक वेलणकर म्हणाले,“ देशाला स्वराज्यपासून सुराज्यकडे नेण्यासाठी युवकांना लढावे लागणार आहे. सरकारी तिजोरीत देशातील प्रत्येक व्यक्ती टॅक्स जमा करतो. त्यामुळे हा पैसा कुठे जातो याची विचारणा करण्याचा अधिकार त्यांना आहे. परंतू मिळणार्या अपुर्या सुविधा आणि वाढती बेरोजगार यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकार आणि प्रशासनात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. घर घर में तिरंगाचा नारा दिल्यानंतर आता सुराज्यचा नारा देण्याची वेळ आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ शिस्त व चारित्र्या या गोष्टीवर अधिक भर देऊन विद्यार्थ्यांनी जीवनाची वाटचाल करावी. आई वडिलांच्या प्रती आपले कर्तव्य कधीही विसरू नये. शिक्षण व अध्यात्म हा जीवनाच आधार असून कसे जगावे आणि कसे जगू नये याचे ज्ञान मिळते. वसुधैव कुटुम्बकम या तत्वानुसार भारत देश २१व्या शतकात संपूर्ण जगाला सुख, शांती आणि समाधानाचा मार्ग दाखवेल.”
पद्मश्री मिलिंद कांबळे म्हणाले,“ देशाला प्रगत करण्यात सोशल आंत्रप्रेन्यूअरशीप मॉडल ची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशाच्या प्रगतीसाठी याची गरज असून यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन येईल.”
त्यानंतर ज्येष्ठ साहित्यीक प्रा. रतनलाल सोनग्रा व प्रियंकर उपाध्येय यांनी आपले विचार मांडले.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी एमआयटीच्या माध्यमातून केल्या जाणार्या शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक कार्याची माहिती दिली.
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मृदुला कुलकर्णी यांनी आभार मानले.
धर्म व भावनात्मक गोष्टी ऐवजी सरकारने कार्य दिशा ठरवावी-प्रा. हरी नरके
Date:

