पुणे, : ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) ‘अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स’मध्ये दहा उद्योगकेंद्री अभ्यासक्रमांचे उद्घाटन डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले.
शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, सहकार्यवाह प्रा. प्राजक्ता प्रधान, मुख्याध्यापिका अनघा डांगे, ‘जेआरव्हीजीटीआय’चे संचालक प्रशांत गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेतून बाहेर पडणारा एकही विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही अशी ‘डीईएस’ची योजना आहे. चांगले व्यावसायिक शिक्षण मिळाल्यास, विद्यार्थ्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही, असा विश्वास डॉ. कुंटे यांनी या वेळी व्यक्त केला.
उद्योगकेंद्री अभ्यासक्रमामुळे उद्योगाला चालना मिळेल. त्यामुळे आत्मसन्मान आणि स्वयंपूर्णता मिळू शकेल. समाजासाठी योगदान देता येईल. या उपक्रमाला माजी विद्यार्थिनींनी पाठबळ द्यावे, असे मत डॉ. साठे यांनी व्यक्त केले.
स्केटिंग, मोबाईल फोटोग्राफी, ज्वेलरी मेकिंग, चॉकलेट मेकिंग, सुलेखन. शिवणकाम, बांधणी, रांगोळी, कॅनव्हास पेंटिंग, नृत्य असे दहा अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून शिकविणार असल्याचे डांगे यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका अनघा डांगे यांनी स्वागत व प्रास्ताविक, उपमुख्याध्यापिका स्वाती मिश्रा यांनी परिचय, पल्लवी पारुंडेकर यांनी सूत्रसंचालन आणि पर्यवेक्षिका स्मिता राजगुरु यांनी आभार प्रदर्शन केले

