पुणे : “मोबाईल, लॅपटॉप, ई-व्हेईकल्स आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर होतो. देशात प्रथमच लिथियम आयन बॅटरी उत्पादित करण्याचे संशोधन पुण्यातील शास्त्रज्ञांनी केले आहे. या संशोधनाला उत्पादनात रूपांतरित करून स्वदेशी लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन सुरु होणार असल्याने भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे,” असे मत संशोधक आणि स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.
टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनतर्फे (टीटीए) भारतीय बनावटीच्या लिथियम आयन बॅटरीची प्रगती यावर आयोजित व्याख्यानात डॉ. शर्मा बोलत होते. रविवारी झूम मिटद्वारे झालेल्या या व्याख्यानावेळी ‘टीटीए’चे यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, विश्वास काळे आदी उपस्थित होते. ‘टीटीए’चे हे ३६ वे व्याख्यान होते. सुपर कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड भारतातील एकमेव कंपनी आहे.
डॉ. राजेंद्रकुमार शर्मा म्हणाले, “लिथियम आयन बॅटरीच्या जगातील संशोधनात भारतीयांचा वाटा ७० टक्के आहे. शिवाय ही बॅटरी बाजारात येऊन २० वर्षे होत आली. मात्र, दुर्दैवाने या बॅटरीच्या उत्पादनात एकही भारतीय कंपनी नाही. ही बाब लक्षात घेऊन मिनिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने सेंटर ऑफ मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन रिचार्जेबल बॅटरी टेक्नॉलॉजी उभारण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर येथे बॅटरीचे संशोधन उत्पादन होत आहे.”
“या बॅटरीची भारतात मोठी गरज आहे. त्यामुळे लघु व माध्यम उद्योगांनी पुढाकार घेऊन लिथियम बॅटरीच्या उत्पादनात उतरले पाहिजे. त्यांना उत्पादनासाठी लागणारे संशोधन, परीक्षण व अन्य सर्व प्रकारचे सहकार्य या सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारा केले जाणार आहे. आर्थिक विकासात आज ‘एमएसएमई’चा हातभार मोठा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात याचे उत्पादन सुरु झाले, तर भारताला चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
“सी-मेटच्या पुण्यातील केंद्रात ३५ हजार स्क्वेअर फूट परिसरात हा प्रकल्प उभारला जात असून, प्रायोगिक तत्वावर येथे बॅटरीचे उत्पादन सुरु होणार आहे. सेल, इलेक्ट्रोड व लागणाऱ्या अन्य गोष्टी पुरविण्यात येतील. ज्या कंपन्यांना या बॅटरीचे उत्पादन करायचे आहे, त्यांच्याशी सामंजस्य करार केला जाईल. त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करण्याची भूमिका या सेंटर ऑफ एक्सलन्सची आहे.” विलास रबडे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास काळे यांनी आभार मानले.

