पुणे-
करोना संकटाच्या दीड वर्षात केंद्र सरकार व राज्य सरकारने सर्कस उद्योगाला मोलाची मदत केली. याबद्दल सारे सर्कस चालक कलावंत व स्टाफ ऋणी आहे अशा भावना रॅम्बो सर्कसचे चालक सुजित दिलीप यांनी आज व्यक्त केल्या. पुण्यातील मुंढवा रेल्वे ओव्हरब्रीजच्या जवळील मैदानात रॅम्बो सर्कसचा मुक्काम असून, भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांच्या तैलचित्रास पुष्पांजली अर्पण केल्यावर ते बोलत होते. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सर्कसच्या मागे सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगून लखनौ, वृंदावन आणि दिल्ली येथे 15 दिवसांचे कॅम्पस् आयोजित करण्यास मदत केली. हे सर्व कॅम्पस् हाऊसफुल झाले. वृंदावनच्या शोचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. तसेच महाराष्ट्रातही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सर्कस उद्योगाला मोठा आधार दिला. याबद्दल आम्ही केंद्र व राज्य सरकारचे आभारी आहोत असे ते म्हणाले.
26 नोव्हेंबर 1882 रोजी मुंबईच्या बोरीबंदर येथे विष्णुपंत छत्रे यांनी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. आज भारतीय सर्कसचा जन्मदिन मानून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्कस मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रवीण तरवडे, सचिव बाळासाहेब शिंदे, दामू धोत्रे यांचे पणतू आनंद धोत्रे, वाजिद, राजू मॅनेजर, सर्कस विदूषक व सर्कस कलावंत उपस्थित होते.
प्रारंभी ‘सर्कस विश्व’चे लेखक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी या दिवसाचे महत्त्व व इतिहास सांगून सर्वांचे स्वागत केले. सर्कसला ‘लोकाश्रय आहे, आता राजाश्रय’ पाहिजे अशा भावना प्रवीण तरवडे यांनी व्यक्त केल्या. ‘भारतीय सर्कस उद्योग आर्थिक संकटात असून, ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी शासनाने मदत करावी, असे बाळासाहेब शिंदे म्हणाले. सर्कस चालू ठेवल्याबद्दल रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप आणि त्यांचे चिरंजीव सुजित दिलीप यांच्याबद्दल आनंद धोत्रे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्रेक्षकांच्या वतीने राजीव जोगदेव यांनी सर्कस कलावंतांचे कौतुक केले. प्रारंभी विदूषक व सर्व सर्कस कलावंतांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. सर्वांनी विष्णुपंत छत्रे यांच्या तैलचित्रास पुष्पांजली अर्पण केली. श्रुती तिवारी यांनी आभार मानले. सर्व कलावंतांना यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले.
भारतीय सर्कसचा जन्मदिन साजरा
Date:

