भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर(POK) मध्ये सर्जिकल स्ट्राइक केली आहे. यात अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताने POK मधील काही निवडक लॉन्च पॅडवर हल्ला केला.पीओकेमधील हा भारताची ही तिसरी मोठी कारवाई आहे.
सुरक्षा दलाच्या सूत्रांनी न्यूज एजेंसी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्य हिवाळ्यापूर्वी अनेक दहशतवादी भारतात पाठवण्याच्या तयारीत होते. या कारणामुळेच भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केली.
गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता अचानक सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर म्हणजेच PoK मध्ये भारतीय सैन्याने एअर स्ट्राइक केल्याच्या बातम्या आल्या. परंतू, 10-15 मिनीटांनंतर या बातम्या काढून टाकण्यात आल्या आणि सांगण्यात आले की, भारताने PoK मध्ये पिनपॉइंट स्ट्राइक केली आहे. न्यूज एजेंसी पीटीआयने या पिनपॉइंट स्ट्राइकची माहिती दिली. यात निवडक दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्धवस्त झाले. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.
मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारीला पीओकेमध्ये एअरस्ट्राइक केली होती. या एअरस्ट्राइकमध्ये वायुसेनेच्या 12 मिराज-2000 फाइटर जेटने बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबादमध्ये बॉम्ब टाकले होते. यात 300 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले होते. वायुसेनेने या मिशनला ‘ऑपरेशन बंदर’नाव दिले होते.
18 सप्टेंबर 2016 ला जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी आर्मी कॅम्पवर हल्ला केला होता. यात 18 भारतीय जवान शहीद झाले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी 29 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याने POK मध्ये 3 किमी आत जाऊन दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करुन सुखरुप परत आले होते. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भारताने पीओकेमध्ये घुसून हल्ला केला होता. या कारवाईत 40-50 दहशतवादी मारले होते.

