नवी दिल्ली, 21 मार्च 2022
भारतीय लष्कर आणि सेशेल्स सुरक्षा दल (SDF) यांच्यातील 9वा संयुक्त लष्करी सराव लॅमितिये -LAMITIYE-2022 सेशेल्स येथील सेशेल्स संरक्षण अकादमी (SDA), येथे 22 मार्च ते 31 मार्च 22 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. भारतीय लष्कर आणि सेशेल्स सुरक्षा दल कंपनी मुख्यालयासह प्रत्येकी एक इन्फंट्री प्लाटून या सरावात सहभागी होणार आहेत . याचा उद्देश निम -शहरी वातावरणात प्रतिकूल शक्तींविरुद्ध विविध कारवाई दरम्यान आलेले अनुभव सामायिक करणे आणि संयुक्त कारवाई हाती घेण्याची क्षमता वाढवणे हा आहे.
2/3 गोरखा रायफल्स (पीरकंथी बटालियन) च्या तुकड्यांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या पथकाचे 21 मार्च 2022 रोजी सेशेल्स येथे आगमन झाले.
लॅमितिये सराव-2022 हा द्वैवार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो 2001 पासून सेशेल्समध्ये आयोजित केला जात आहे. विशेष म्हणजे, भारताने विविध देशांसोबत केलेल्या लष्करी प्रशिक्षण सरावांच्या मालिकेत; सध्याची जागतिक परिस्थिती आणि हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षेच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रांसमोरील सुरक्षा आव्हानांच्या दृष्टीने सेशेल्सबरोबरचा हा सराव महत्त्वाचा आहे.
10 दिवस चालणार्या या संयुक्त सरावामध्ये क्षेत्रीय प्रशिक्षण सराव, सामरिक चर्चा, व्याख्याने, प्रात्यक्षिके यांचा समावेश असेल आणि दोन दिवसांच्या प्रमाणीकरण अभ्यासाने याची सांगता होईल. दोन्ही सैन्यांमध्ये कौशल्य, अनुभव आणि चांगल्या पद्धतींची देवाणघेवाण करण्यासोबतच द्विपक्षीय लष्करी संबंध दृढ करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या संयुक्त प्रशिक्षण सरावाचा उद्देश आहे. दोन्ही बाजूंकडून संयुक्त कारवाईसाठी नवीन पिढीतील उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करताना निम -शहरी वातावरणात उद्भवू शकणार्या संभाव्य धोके टाळण्यासाठी संयुक्त प्रशिक्षण, नियोजन आणि सु-विकसित सामरिक कवायतीं करेल. निम -शहरी वातावरणात प्रतिकूल शक्तींचा मुकाबला करण्यासाठी सामरिक कौशल्ये वाढवण्यावर आणि सैन्यांमधील आंतर -परिचालन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.
भारतीय लष्कर पथकाचे कमांडर मेजर अभिषेक नेपाल सिंग म्हणाले, “द्विपक्षीय लष्करी सहकार्य आणि दोन्ही सैन्यांमधील परस्पर कार्यक्षमता बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देणारा द्विवार्षिक सराव हा सेशेल्समध्ये होणारा सराव आहे. अनेक परिस्थितीवर आधारित चर्चा आणि रणनीतिक अभ्यासाद्वारे व्यावहारिक पैलू सामायिक करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
या संयुक्त लष्करी सरावामुळे भारतीय लष्कर आणि सेशेल्स सुरक्षा दल (SDF) यांच्यातील संरक्षण सहकार्याची पातळी वाढेल आणि उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतील.

