पुणे-”ज्यावेळी आपण इतिहासाकडे पाहतो, तेव्हा महाभारत रामायणातही खेळ हे शिक्षणाचा भाग होते. त्यामुळे सरकार देशातील सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे आणि कायम सोबत राहणार आहे. आता खेळामध्ये महिलांची संख्या कशी वाढेल. यावर देखील लक्ष असणार आहे. आज ज्या भूमीमध्ये आलो आहे. त्या भूमीमधील खेळामुळेच बालशिवाजी छत्रपती शिवाजी बनले. माता जिजाऊ, दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासांनी त्यांना क्रीडाप्रकारातूनच डावपेच शिकवले. नेमबाजी तलवारबाजी कुस्ती अशा माध्यमातून आपल्या इतिहासातही खेळांची परंपरा आहे. पूर्वी तक्षशीला नालंदा विद्यापीठांमध्ये क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण घ्यायला परदेशातून विद्यार्थी येत. आपण खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. भारतालाही लवकरात लवकर ऑलिंपिकचे यजमानपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त करतो”, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.
पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राचे नाव देण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या समारंभाचे उद्घाटन केले. ‘नीरज चोप्रा स्टेडियम आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ असे नाव या स्टेडियमला देण्यात आले आहे. यावेळी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे हेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.
राजनाथ सिंह म्हणाले, ”आपल्या देशाचे नाव सर्व खेळाडूंनी जगभराता पोहोचवले. हे सर्व खेळाडू अभिनंदनास पात्र आहेत. आजवर ज्या खेळाडूंनी पदके मिळवली आहेत, त्या खेळाडूच्या पंगतीत आता सुभेदार नीरज चोप्रा हे जाऊन बसले आहेत. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. तसेच आपल्या सर्वासाठी करोनाचा काळ कठीण होता. तेव्हा आपल्या जवानांनी अनेक खेळाडूंना घरी जाऊन साहित्य दिले. तर काहींच्या घराजवळ शूटिंग रेंज तयार केली.यामुळे सर्व जवानांचे अभिनंदन करतो. आता येणार्या काळात आपण सर्व प्रकाराच्या खेळाकडे लक्ष देणार आहोत, यातून अधिकाधिक कसे पदके मिळतील. याकडे विशेष लक्ष असणार आहे.”