श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने प्रवचनमालेचे आयोजन ; उत्सवाचे २६१ वे वर्ष
पुणे: हिंदू संस्कृतीत विश्व हे आपले घर मानले आहे. या विश्वरूपी घराचे देवघर म्हणजे भारत आहे. ज्यांनी या भारताला सुंदर देवघर केले, त्यामध्ये प्राधान्याने आचार्य, संत महात्मा, प्रवचनकार, कीर्तनकार आणि मुख्य म्हणजे सगुण अवतार यांचा समावेश आहे. प्रभूरामचंद्र आणि श्रीकृष्ण या दोन अवतारांचे भारतीय संस्कृतीवरील ऋण न फिटणारे आहे. त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे संकीर्तन करायला हवे आणि हे राष्ट्र पुन्हा प्रबळ होईल, ही सात्विक महत्वकांक्षा बाळगायला हवी, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी केले.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात शंकर अभ्यंकर यांच्या पाच दिवसीय प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनमालेच्या पहिल्या दिवशी ते बोलत होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष आहे.
शंकर अभ्यंकर म्हणाले, प्रभू रामचंद्रांचे चरित्र सर्वार्थाने अलौकिक आहे. जोपर्यंत या पृथ्वीतलावर सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत प्रभू रामचंद्रांची कथा गायली जाणार. ती निश्चळ आणि अचळ आहे. रामकथा गगनाला व्यापून उरली आहे. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेला हा रामायाणाचा इतिहास आपल्या जीवनात अत्यंत प्रमाण आहे. परकिय आक्रमणे झाली तेव्हा हा इतिहास खोटा ठरविण्यात आला. परंतु आता अभ्यासातून हा इतिहास खरा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रामदास तुळशीबागवाले म्हणाले, गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान होणा-या श्रीरामजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण सभामंडप व मंदिर परिसरात झुंबरे लावण्यात आली आहेत. उत्सवांतर्गत दररोज रामायण वाचन, श्रीरामांची महापूजा व आरती, तसेच सायंकाळी श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे. तसेच भक्तीप्रवचन, सांगितीक कार्यक्रम, कीर्तन, भजन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत देश हे विश्वरुपी घराचे देवघर- विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
Date:

