पुणे-संयुक्त महाराष्ट्र होण्यात पुण्याच्या काँग्रेस भवनाचं महत्वाचं योगदान आहे असे सांगून,कॉंग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही. असे स्पष्ट करत भाजपच्या काँग्रेसमुक्त भारत या नाऱ्यावर आणि काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
तब्बल 24 वर्षानंतर शरद पवारांनी आज पुण्याच्या काँग्रेस भवनात पाऊल ठेवलं. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांना काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. काँग्रेस भवनात दाखल होतात काँग्रेस नेत्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. सन १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. २००४ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान पवारांनी पुण्यातील काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली होती.
आज कॉंग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, “काही लोक कॉंग्रेसमुक्त भारत करायच म्हणतात. पण कॉंग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही प्रमाणात आहेत. पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावं लागणार आहे. सत्ताधारी पक्ष हा देशामध्ये विद्वेष निर्माण करत आहे. आत्ताचं सरकार काँग्रेसविरोधी विद्वेशाची भावना कशी निर्माण होईल यातच धन्यता मानत आहे. पण काँग्रेसी विचार सोडता येणार नाहीत. काँग्रेस पक्षाला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला वर्धापनदिनानिमित्त काँग्रेस भवनात येण्याचं आमंत्रण दिलं”
मी पहिल्यांदा सन 1958 मध्ये कॉंग्रेस भवनमधे आलो होतो. आज अनेक वर्षांनी पुन्हा आलोय. त्याकाळी कॉंग्रेसमधे अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे असं त्यावेळी समीकरण होतं. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचं केंद्र इथेच होतं. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तूतून चालायचा. इथून कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हेअन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यामध्ये पुण्यातील कॉंग्रेस भवनचं योगदान मोठं आहे, अशी आठवणही यावेळी शरद पवार यांनी सांगितली.

