पुणे- तक्रार मागे घेण्यासाठी टोळक्याने एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने वार केला. ही घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. याप्रकरणी डब्लुसिंग पंजाबसिंग टाक (वय 31) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या साथीदारांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू माने (वय 53) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू माने यांचा मुलगा आणि आरोपी डब्लूसिंग यांच्यात काही महिन्यांपुर्वी वादावादी झाली होती.दरम्यान त्यांनी फिर्यादी यांच्या मुलाला अडवत त्याच्यावर तलवारीने वार करत गळ्यातील चैन चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांना दोन दिवसांपूर्वी प्रगती शाळेसमोर आल्यानंतर अडविले. तसेच, त्यांना तुमच्या मुलाने दिलेली तक्रार माघे घे, असे म्हणत वाद घातला.तर त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पसार झालेल्या एकाला पकडले. तर सराईत गुन्हेगार पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माने हे करत आहेत.

