मुंबई 14 जून 2022
राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ या नव्याने बांधण्यात आलेल्या वास्तूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले.
जलभूषण या वास्तूला किमान 200 वर्षांचा इतिहास आहे. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी मलबार हिल येथे सन 1820 – 1825 या काळात ‘प्रेटी कॉटेज’ नावाचा छोटा बंगला बांधला होता. ‘जलभूषण’ ही वास्तू याच जागेवर उभी आहे.

सन 1885 साली मलबार हिल येथे ‘गव्हर्न्मेंट हाउस’ स्थलांतरित झाल्यापासून या वास्तूमध्ये ब्रिटीश गव्हर्नर यांचे व स्वातंत्र्यानंतर मुंबईच्या व राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान राहिले आहे.

अनेकदा बांधली गेलेली व विस्तारित केलेली जुनी वास्तू निवासासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आल्यामुळे या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचे ठरविण्यात आले. 18 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या ‘जलभूषण’ इमारतीची पायाभरणी देखील केली होती. हे बांधकाम पूर्ण झाले असून नव्या वास्तूचे द्वारपूजन पंतप्रधानांच्या हस्ते याआज करण्यात आले.
नवीन ‘जलभूषण’ वास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वारसा वैशिष्ट्ये जतन करण्यात आली आहेत.