पुणे, दि. 8 – जागतिक फिजिओथेरपी दिनाचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) उद्घाटन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगींवार यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले.
डीईएसच्या परिषद आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस अधीक्षक तुषार दोशी, डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर, प्राचार्या स्नेहल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांधेदुखी, हाडांची दुखणी, श्वसनाचे विकार, मेंदूचे विकार, लहान मुलांचे आजार आणि सर्वसाधारण शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारे फिजिओथेरपीचे अद्ययावत उपचार याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. समाजातील सर्व आर्थिक स्तरातील रुग्णांना परवडतील असे किफायतशीर दर आकारण्यात येणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 7 ही ओपीडीची वेळ आहे.
आरोग्याची देखभाल मोठ्या रुग्णालयांच्या आवाक्याबाहेर जात असताना, अशा प्रकारच्या बाह्यरुग्ण विभागांची उपयुक्तता अधिक आहे. आरोग्याबाबत लहान मुलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. असे मत डॉ. बंगींवार यांनी व्यक्त केले. समाज माध्यमे आणि सायबर क्क्राइम या संदर्भात दोशी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कुंटे म्हणाले, ‘‘हे ओपीडी केंद्र समाजसेवेचे नवे दालन ठरेल. परंपरा आणि इतिहासाला सुसंगत अत्युत्तम गुणवत्तेचे, अधिकाधिक रोजगार निर्मिती करणारे आणि समाजसेवेची संधी देणारे शिक्षण देण्यासाठी डीईएस कटिबद्ध आहे.’’ हर्षदा सोनवणे यांनी सूत्रसंचालन आणि रेणुका नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.